कोल्हापुरात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक आमदार, लोकप्रतिनिधी विनामास्क व्यासपिठावर उपस्थित !
राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधीच जर ‘मास्क’सारखे सामान्य नियमही पाळत नसतील, तर राज्यातील जनतेकडून ते पाळण्याची अपेक्षा कशी ठेवणार ? – संपादक
कोल्हापूर, १० फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापुरात १० फेब्रुवारी या दिवशी झालेल्या एका वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमात व्यासपिठावर उपस्थित आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आमदार पी.एन्. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयंत पाटील-आसगावकर, आमदार राजेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्यापैकी एकानेही ‘मास्क’ लावलेला नव्हता. एकीकडे शासन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने ‘मास्क वापरा’, असे प्रबोधन करतांना आढळते, तर दुसरीकडे कोल्हापूर येथे मात्र सरकारमधीलच मंत्री, विविध लोकप्रतिनिधी हे नियम पायदळी तुडवतांना दिसून येतात.
कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिकांनी मात्र ‘मास्क’ घातले होते. त्यामुळे सामान्यांकडून मास्क नसेल, तर दंडाची रक्कम वसूल करणारे प्रशासन वरील मंत्री, आमदार यांच्याकडूनही दंड वसूल करणार का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.