गुरुकार्याचा ध्यास आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शैलजा केदारी (वय ५८ वर्षे) !
सौ. शैलजा केदारी यांची सधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. श्वेता पट्टणशेट्टी, नगर
१. वक्तशीरपणा : ‘सौ. शैलजाकाकू ठरलेल्या वेळेत सत्संगांना आणि सेवेच्या ठिकाणी उपस्थित असतात.’
२. साधनेचे गांभीर्य : ‘काकू पहाटे लवकर उठून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात. त्यांचे चिंतनसारणीनुसार सर्व प्रयत्न नियमितपणे होतात.
३. गुरुकार्याची तळमळ : ‘मी पुण्यात असल्यापासूनच काकूंना ओळखते. तेव्हापासून आतापर्यंत काकू त्याच तळमळीने गुरुकार्य करत आहेत. काकू विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा पुष्कळ तळमळीने करतात. त्यांच्या समवेत सेवेला जाण्यासाठी कधी कुणी साधक उपलब्ध नसेल, तरी त्या एकट्या जातात. काकूंची अधिकाधिक विज्ञापने आणि अर्पण मिळवण्यासाठी पुष्कळ तळमळ असते.
४. अहं अल्प असणे : जिज्ञासूंकडे विज्ञापन किंवा अर्पण मागतांना काकूंना प्रतिमेचे विचार येत नाहीत.’
५. स्वतःला पालटण्याची तळमळ : ‘काकू मनमोकळेपणाने बोलण्यासाठी चांगले प्रयत्न करतात. त्या त्यांच्या मनातील विचार लगेच बोलून दाखवतात आणि त्यामध्ये ‘माझे काही चुकले आहे का ?’, असेही विचारतात.
६. जाणवलेले पालट
अ. ‘त्यांच्यातील प्रेमभाव वाढला आहे’, असे जाणवते. त्या इतरांनाही सेवेत मनापासून साहाय्य करतात. त्यामुळे आता मलाही त्यांचा आधार वाटतो. ‘काकूंना कुठलीही सेवा सांगितली की, ती पूर्ण होणार’, याची मला निश्चिती असते.
आ. पूर्वी काकूंकडून चुका स्वीकारल्या जायच्या नाहीत; पण आता त्या सहजतेने चुका स्वीकारतात. त्या स्वतःत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यातील स्वतःला पालटण्याची तळमळ वाढली आहे.’
कु. प्रियांका लोणे, संभाजीनगर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१. नम्रता : ‘काकू सर्वांशीच नम्रतेने बोलतात. त्या कधीच कुणाशी रागावून बोलत नाहीत.
२. प्रेमभाव : काकू पुष्कळ प्रेमळ आहेत. त्यांच्या घरी मी कधी राहिल्यास त्या माझ्याशी मुलीप्रमाणे प्रेमाने वागायच्या. काकूंमधील प्रेमभावामुळे सगळे जण त्यांच्याशी बोलतात. त्यांचे घर सर्वांना हक्काचे वाटते.’
३. कृतज्ञताभाव : ‘त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला भाव आणि श्रद्धा यांमुळे आतापर्यंत देवाने त्यांच्याकडून अव्याहत सेवा करवून घेतली. त्यासाठीही त्यांच्या मनात सतत कृतज्ञता असते. त्यांची गुरुदेवांविषयी बोलतांना लगेच भावजागृती होते.’
४. जाणवलेले पालट
अ. ‘ काकूंचे बोलणे पूर्वीपेक्षा आता पुष्कळ लाघवी आणि मधुर असते. आता त्यांच्याशी बोलतांनाही पुष्कळ आनंद जाणवतो.
आ. आधी काकूंच्या मनात साधकांविषयी तीव्र पूर्वग्रह असायचे आणि त्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या. आता त्यांच्यात साधकांविषयी असलेल्या अपेक्षांचे प्रमाण न्यून होऊन त्यांच्यात प्रेमभाव वाढला आहे. आता त्या ‘मी कुठे न्यून पडले ? त्यासाठी काय प्रयत्न करू ?’, असा विचार करतात. त्यांची अंतर्मुखता वाढली आहे.
इ. त्यांच्यात ‘व्यापकत्व आणि पुढाकार घेऊन सेवा करणे’, असा भागही वाढला आहे.
ई. आधी काकू फार मोजकेच बोलायच्या. आता त्या सर्वांशी सहजतेने आणि मनमोकळेपणे बोलतात.
उ. गेल्या काही दिवसांपासून ‘त्यांच्यामध्ये गुरुदेवांप्रतीचा भाव वृद्धींगत झाला आहे’, असे लक्षात येते. त्या सत्संगात प्रार्थना सांगत असतांना आतून आनंद अनुभवायला मिळतो.’ (सर्व सूत्रांचा दिनांक : जुलै २०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |