हिजाबच्या आडून शरीयतचा अट्टहास !
संपादकीय
|
कर्नाटकात बुरखा घालून आलेल्या एका विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या आवारात आजूबाजूला शेकडो हिंदु युवक असतांना ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या. याचा कट्टरपंथियांना फारच पुळका आला असून ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या धर्मांध संस्थेकडून तिला ५ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. असे करून जमियतसारख्या संघटना विद्यार्थीदशेपासूनच मुसलमान मुलांमध्ये कट्टरता जोपासण्यासाठी सरळसरळ प्रोत्साहत देत आहेत. वास्तविक कोणतेही भय न बाळगता ही विद्यार्थिनी असे का करू शकली ? हीच परिस्थिती जर उलट असती, तर ? म्हणजे एकटी हिंदु मुलगी आणि धर्मांध मुलांचा जमाव असता, तर त्या मुलीचे काय झाले असते, याचा विचारही न केलेला बरा ! संबंधित धर्मांध युवती रातोरात धर्मांधांच्या गळ्यातील ताईत बनली आहे; मात्र या घटनेचा दुसरा भाग म्हणजे हिंदु विद्यार्थी या तरुणीच्या जवळही गेले नाहीत अथवा तिला काही इजाही केली नाही, या सूत्रांचा कुणी विचारही करत नाही, हे लक्षात घ्या ! ही पूर्ण घटनाच हिंदु संस्कृती आणि इस्लामी विचारधारा यांतील भेद स्पष्ट करते. मुंबईतील आझाद मैदानावर रझा अकादमीने केलेल्या दंगलीच्या वेळी हिंदु महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला. हिंदु समाज हे कधीही विसरणार नाही.
‘हिजाब घालणे, हा आमचा हक्क आहे’, असे म्हणणे हे एक निमित्त असून उद्या हेच कट्टरपंथीय बुरख्याची मागणी करतील, पुढे शाळेतच नमाज पढण्याची मागणी करतील आणि त्याही पुढे जाऊन शरीयतप्रमाणे सर्व करा, अशी मागणी करतील ! कोणत्याही देशात धर्मांधांची संख्या वाढली की, हळूहळू कशा प्रकारे ते कुरापती काढून इस्लामची विचारधारा अन्य धर्मियांवर लादण्याचा प्रयत्न करतात, त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे.
साडी ही हिंदु संस्कृतीची ओळख !
हिजाबचे समर्थन करतांना पुरोगाम्यांकडून ‘जशी साडी नेसलेली चालते किंवा कुंकू लावलेले चालते, तसाच हिजाबही चालवून घ्यायला हवा’, असे सांगितले जात आहे. ‘हिंदु महिला डोक्यावरून पदर घेतात, ते कसे चालते ?’, असाही आक्षेप घेत अकलेचे तारे तोडले जात आहेत. त्याही पुढे जाऊन ‘उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवे वस्त्र नेसून मुख्यमंत्री पदाच्या आसंदीवर कसे काय बसू शकतात आणि साध्वी प्रज्ञासिंह याही भगवे वस्त्र नेसून विधानसभेत कसे काय येऊ शकतात ?’, असेही प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित केले जात आहेत. असे आक्षेप हे मूळ विषयाकडून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी घेतले आहेत. वास्तविक देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद जे एक मुसलमान होते त्यांना ‘मुलींनी हिजाब घालून शाळेत यावे’, असे वाटले नाही. त्यांनी साडी परिधान करून मुलांना शिकवणार्या शिक्षिकांविषयी कधी आक्षेप घेतला नाही. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी याही साडी परिधान करत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या ही साडी नेसत होत्या आणि टिकली लावत होत्या, तसेच त्या नेहमीच डोक्यावरून पदर घेत असत. न्याययंत्रणेमध्ये अगदी कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक महिला न्यायाधीश साडी परिधान करतात आणि टिकलीही लावतात. अनेक राज्यांच्या महिला मंत्री साडी परिधान करतात आणि टिकलीही लावतात. इतकेच नव्हे, तर माकपच्या नेत्या वृंदा करात याही साडी नेसतात आणि मोठ्या आकाराची टिकलीही लावतात. भारतातील बहुतांश महिला नेत्या स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेत नाहीत, तरीही त्यांनी याचा स्वीकार केला. याचा अर्थ सहस्रो वर्षांपासून चालत आलेली या भूमीतील संस्कृती त्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे हिजाबच्या वादात कुणी कुंकू, साडी यांना ओढत असेल, तर ते अतर्क्य आणि न पटणारे आहे.
हिजाबचा आताच आग्रह का ?
या संदर्भात ९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयाने न्यायाधीश कृष्ण दीक्षित हिजाबच्या संदर्भात चालू असलेल्या सुनावणीत म्हणाले, ‘‘मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हा शाळेचा एकच रंग होता. सगळे विद्यार्थी एकच पोषाख परिधान करत असत.’’ यावरून हे स्पष्ट होते की, शिक्षिका किंवा विद्यार्थिनी यांच्या कुंकू, टिकली किंवा साडी यांना आतापर्यंत कधीच विरोध झाला नाही; कारण ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे. हिजाब ही आक्रमकांची संस्कृती आहे. आतापर्यंत त्यासाठी भारतातील मुसलमानांनी इतका आग्रह धरला नाही. आता ते याचा आग्रह धरत आहेत; कारण त्यांना भारतीय संस्कृती पालटून इस्लामी संस्कृती या मातीत रुजवायची आहे.
भारतात हिंदु संस्कृतीचेच संवर्धन अत्यावश्यक !
सर्वसामान्य भारतियांची इच्छा आहे की, ‘भारतात फिरतांना ‘आम्ही भारतात आहोत’, असे वाटले पाहिजे. भारतीय शाळांमध्ये गेल्यानंतर आपण पाकिस्तानमधील किंवा अफगाणिस्तानमधील एखाद्या शाळेत आहोत, असे वाटू लागले, तर भारतातील मूळ संस्कृतीचे महत्त्व काय ?’ आज सर्व प्रगत देश त्यांची मूळ संस्कृती जपली जावी, यासाठी आग्रही आहेत. हिंदु संस्कृती तर ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे जगाचे कल्याण चिंतणारी संस्कृती आहे. कोरोना संसर्गाच्या काळात भारतीय संस्कृतीमधील नमस्कार करणे, मृत्युत्तर दहन करणे, शाकाहार, आयुर्वेद, गंगाजलाचे महत्त्व याच गोष्टी तारणहार असल्याचे आता जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे व्यक्तीच्या पारलौकिक उन्नत्तीसाठी कार्यरत असलेल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन आवश्यक आहे. या मातीत हिजाबची मागणी लावून धरून कुणी शरीयत कायदे अस्तित्वात आणण्याची दिवास्वप्ने पहात असतील, तर शासनकर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर इतर संस्कृती मिटवण्यासाठी ते वेगवेगळ्या घटनांचा कसा उपयोग करतात, त्याचेच ‘हिजाबची मागणी’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यावरून समान नागरी कायद्याची अत्यावश्यकता स्पष्ट होते !