हिंदूंच्या सामर्थ्यापुढे कुणीच टिकू शकत नाही ! – सरसंघचालक
हिंदूंचे हित, म्हणजे राष्ट्रहित असले पाहिजे !
भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदूंचे सामर्थ्य इतके आहे की, त्यांच्यासमोर कुणीच टिकू शकत नाही, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. ते संत रामानुजाचार्य यांच्या जयंतीच्या समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.
सरसंघचालकांनी मांडलेली सूत्रे
सौजन्य : जनसत्ता
१. देशाची प्राथमिकता हिंदूंचे हित, म्हणजे राष्ट्रहित असली पाहिजे. अन्य हित, म्हणजे भाषा, जाती आदी गौण आहेत. आम्ही अशा कोणत्याही गोष्टींत सहभागी होणार नाही, ज्यामुळे अंतर्गत संघर्ष निर्माण होईल.
२. हिंदु कुणाच्याही विरोधात नसतात. ज्यांनी हिंदूंना नष्ट करण्याचा प्रयत्न केला ते आज संपूर्ण जगात आपसांतच लढत आहेत.
३. काही हिंदूंच्या मनातील भीतीचे कारण म्हणजे की, ते विसरले आहेत की, ते कोण आहेत ? गेल्या एक सहस्र वर्षांत आपल्याला नष्ट करण्याचे प्रयत्न झाले; मात्र ५ सहस्र वर्षे प्राचीन असलेला आपला सनातन धर्म अमर आहे. इतक्या अत्याचारांनंतरही आपल्याकडे मातृभूमी आहे, साधने आहेत. असे असतांना आपल्याला भीती वाटण्याची काय आवश्यकता ? भीतीपोटी आपण जीवनाप्रतीचा समग्र दृष्टीकोन विसरलो आहोत.
४. देशावर झालेल्या अमानुष अत्याचारांनंतरही या देशात ८० टक्के हिंदू आहेत. जे देश चालवत आहेत, शासन करत आहेत, तेही बहुतांश हिंदू आहेत. आपल्या परंपरांनी जे शिकवले, ते स्थायी आहे. राष्ट्रहित आपले पहिले प्राधान्य असले पाहिजे. यामुळेच आम्ही भक्कम आणि सक्षम राष्ट्र बनू आणि त्यातून भीती नष्ट होईल.