सौ. राजश्री देशमुख यांना ध्यानाला बसल्यावर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. राजश्री देशमुख

१. ध्यानाला बसल्यावर नामदेवतेला प्रार्थना होणे, नामदेवतेचे दर्शन होऊन ती चतुर्भुज असल्याचे लक्षात येणे आणि ‘भक्ताने नामदेवतेला हाक मारल्यावर ती त्याला योग्य तो जप देते’, असे जाणवणे

‘३.१०.२०१९ या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी ध्यानाला बसले होते. तेव्हा माझ्याकडून नामाला प्रार्थना झाली, ‘हे, नामा, नामदेवते, नामपुरुषा, तू मला अंतर देऊ नकोस. मला सतत तुझे स्मरण राहू दे. तुझे चैतन्यदायी, आनंददायी नाम सतत माझ्या मुखात राहू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे’. त्या वेळी मला प्रकाशात नामदेवतेचे दर्शन झाले आणि ‘ती चतुर्भुज आहे’, असे दिसले. तिच्या वरच्या दोन हातांपैकी उजव्या हाताने ती आशीर्वाद देत आहे आणि तिच्या डाव्या हातात माळ आहे, तर खालील दोन हातांपैकी उजव्या हातातून (जशा श्री महालक्ष्मीच्या हातातून सुवर्णमुद्रा बाहेर पडतात, तसेच नामदेवतेच्या हातातून) ‘नाम बाहेर पडत आहे’, असे मला दिसले. ‘जेव्हा भक्त नामदेवतेला हाक मारतात, तेव्हा ती त्याला आवश्यक असा जप (देवतेचा, पंचमहाभूतांचा किंवा बीजमंत्र) त्याच्या आवश्यकतेनुसार देते, म्हणजेच नामदेवतेची कृपा त्या भक्तावर होते’, असे मला जाणवले. ‘नामदेवतेच्या चौथ्या हातात काय होते ?’, हे मला स्पष्ट दिसले नाही.

-सौ. राजश्री देशमुख, सोलापूर (३.१०.२०१९)

२. साधिकेला नामदेवतेच्या चौथ्या हातातील घटक सुस्पष्ट न दिसण्यामागील कारण

साधना वाढत गेल्यावर सूक्ष्म पंचज्ञानेंद्रिये जागृत होणे चालू होतात. ज्या वेळी पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळ्यांना चैतन्याचा पुरवठा होणे चालू होते, त्या वेळी देवदर्शनाची अनुभूती येणे चालू होते. सूक्ष्म पंचज्ञानेंद्रियांना टप्प्याटप्प्याने चैतन्य मिळत असल्याने ते प्रथम अल्प कालावधीसाठी, तर नंतर सतत जागृत असतात. प्राथमिक टप्प्याला अल्प कालावधीसाठी डोळ्यांना चैतन्य प्राप्त होत असल्याने एकाच वेळी देवतेचे पूर्ण दर्शन न होता टप्प्याटप्प्याने देवदर्शन होण्याची प्रक्रिया घडते. हीच प्रक्रिया साधिकेच्या संदर्भात घडल्याने तिला नामदेवतेचे दर्शन होतांना तीन हातांतील घटक सुस्पष्ट दिसले; पण चौथ्या हातातील घटक सुस्पष्ट दिसले नाहीत.

श्री. निषाद देशमुख

३. नामदेवतेच्या चौथ्या हातात कमळ असून विविध योगमार्गांनुसार त्याचा भावार्थ

नामदेवतेने तिच्या चौथ्या हातात कमळ धारण केले आहे. याचे विविध योगमार्गांनुसार भावार्थ पुढे दिले आहेत.

३ अ. भक्तीयोग : मोक्षाची देवता विष्णु गणली गेली आहे. ‘नामदेवता’ भगवान श्रीविष्णूचे एक रूप असल्याने तिने विष्णुतत्त्व आणि त्याच्याशी निगडित मोक्ष देण्याच्या कार्याचे प्रतीकस्वरूप हातात कमळ धारण केले आहे.

३ आ. कुंडलिनीयोग : कुंडलिनीचक्रांतील प्रत्येक चक्राला कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे पाकळ्या असतात, तर जागृत कुंडलिनी उमललेल्या कमळाप्रमाणे असते. नामजपातून एकेक करून कुंडलिनीचक्र जागृत होऊन व्यक्तीला मोक्ष मिळण्याच्या क्रियेचे प्रतीकस्वरूप म्हणून नामदेवतेने हातात कमळ धारण केले आहे.

३ इ. ज्ञानयोग : देवतांनी हातात धरलेले घटक त्यांचे कार्य दाखवतात. नामदेवतांनी डाव्या हातात धरलेली माळ आणि कमळ व्यक्तीची व्यष्टी स्थिती अनुक्रमे अखंड नामजप अन् अनुभूती यांचे प्रतीक आहे. याउलट उजव्या हाताची आशीर्वाद देणारी मुद्रा आणि त्यातून सतत प्रगट होणारा नामजप नामधारकाच्या अस्तित्वामुळे समष्टीला अनुक्रमे चैतन्य मिळण्याचे अन् आपोआप नामजप चालू होण्याच्या क्रियेचे प्रतीक आहे.

३ ई. नामसंकीर्तनयोग : नामजपामुळे व्यक्तीच्या अंतर्मनात जागृत होणार्‍या अनुभूतीचे प्रतीक स्वरूप नामदेवतेने तिच्या हातात कमळ धारण केले आहे.

३ उ. दर्शनशास्त्र : कमळ चिखलात उमलते. याप्रकारे व्यक्तीच्या मनात स्वभावदोषरूपी कितीही चिखल असला, तरी त्यात नामजपाचे कमळ प्रगटून चैतन्याची अनुभूती मिळण्याचे प्रतीक म्हणून नामदेवतेने हातात कमळ धारण केले आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०२०, दुपारी १२.३०)

४. हे विचार मनात येत असतांना माझे मन शांत, स्थिर आणि आनंदी होते अन् ध्यानानंतर मला हलकेपणा जाणवला.’

– सौ. राजश्री देशमुख, सोलापूर (३.१०.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक