साधिकेने चित्ररूपाने परात्पर गुरुमाऊलींना केलेल्या प्रार्थना !
१. आध्यात्मिक त्रास होत असतांना गुरुमाऊलींनी सूक्ष्मातून ‘चांगले प्रसंग आठव, शक्ती मिळेल’, असे सांगणे, त्या वेळी ‘चित्रे काढायला हवीत’, असे वाटणे आणि गुरुमाऊलींनीच ती चित्रे काढून घेतल्याची अनुभूती येणे
‘ऑगस्ट २०१८ मध्ये मला त्रास होत होता आणि माझी व्यष्टी साधनासुद्धा परिपूर्ण होत नव्हती. मला आतून पुष्कळ निराशा आली होती आणि सहसाधकांनाही काही सांगता येत नव्हते. त्या वेळी गुरुमाऊलींनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘चांगले प्रसंग आठव. शक्ती मिळेल.’ तेव्हा अकस्मात् पुढील २ प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आले आणि मग आतूनच मला वाटायला लागले, ‘आपण ही चित्रे काढायलाच पाहिजेत. २ – ३ दिवसांनंतर शिबिरासाठी रामनाथीला जायचे आहे, तर प.पू. गुरुमाऊलींना ही चित्रे दाखवू.’ त्रास होत असतांनासुद्धा गुरुमाऊलींनी ही चित्रे माझ्याकडून काढून घेतली. ‘प.पू. गुरुमाऊली, आज मी जी काही आहे, ती आपल्यामुळेच आहे. आपण या असमर्थ जिवावर अनंत कृपा करत आहात; म्हणून मी आपल्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
२. मायेच्या दलदलीतून बाहेर काढून देवाच्या चरणांजवळ नेण्यासाठी साधिकेने केलेली प्रार्थना !
हे श्रीकृष्णा, या मायेच्या दलदलीतून तूच मला बाहेर काढ. केवळ बाहेरच काढू नकोस, तर मला तुझ्या चरणांजवळ ने.
२ अ. पूर्णवेळ साधना करण्यासाठी मनाचा संघर्ष होणे आणि नामजप करतांना ‘प.पू. गुरुदेवांनी आपला हात धरला आहे’, असे दृश्य दिसल्यावर प्रार्थना होऊन मन स्थिर होणे : मी सनातन संस्थेशी जोडले गेले आणि गुरुदेवांच्या कृपेने मला साधना समजली. त्यानंतर पूर्णवेळ साधना करण्यासाठी माझ्या मनाचा संघर्ष होत होता. तेव्हा नामजप करतांना माझ्या डोळ्यांसमोर अकस्मात् ‘प.पू. गुरुदेवांनी आपला हात धरला आहे’, हे दृश्य दिसले आणि गुरुदेवांचे रूप दिसून त्यांच्या चरणी मी पुढील प्रार्थना केली, ‘हे भगवंता, (प.पू. गुरुमाऊली), या मायेच्या दलदलीत मी पूर्णपणे अडकले आहे. आता तूच मला यातून बाहेर काढू शकतो. देवा, या मायेच्या विचारांमुळे मी तुझ्यापासून दूर जात आहे; परंतु तू माझा हात धरलाच आहे; मला तुझ्या चरणांशी यायचे आहे. मला साहाय्य कर.’ त्यानंतर माझे मन स्थिर झाले. पुष्कळ वेळा हे दृश्य दिसून मला आनंद होत असे. तेव्हा ‘आपण त्यांच्या चरणांपर्यंत जाऊच’, असे सकारात्मक विचार माझ्या मनात येत असत.
३. संत मीराबाईंसारखी भक्ती करता येण्यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी केलेली प्रार्थना !
३ अ. साधनेत आल्यावर मीराबाईंप्रमाणे भक्ती करावीशी वाटणे आणि मनाचा संघर्ष होत असतांना ‘संत मीराबाई आनंदात कृष्णनाम घेत आहेत’, असे दिसणे : संत मीराबाई मला पुष्कळ आवडतात. मी साधनेत नव्हते, तेव्हापासून मला त्यांची गोडी आहे. त्यांची कृष्णाप्रतीची भक्ती मला पुष्कळ आवडते. साधनेत आल्यावर मला मीराबाईंसारखी भक्ती करावीशी वाटते. जेव्हा मला पूर्णवेळ साधना करायची होती, तेव्हा बर्याच अडचणी येत होत्या. कुटुंबियांनासुद्धा त्रास होत होता. मी आश्रमातून घरी गेले. तेव्हा ‘मी आता आश्रमात पुन्हा येऊ शकणार नाही’, असे विचार माझ्या मनात होते. तेव्हा नामजप करतांना मला संत मीराबाई दिसल्या आणि ‘त्या आनंदात कृष्णनाम घेत आहेत’, असे मला दिसत होते.
३ आ. संत मीराबाईंचे जीवन आठवल्यावर प्रसन्न वाटून ‘संघर्ष करण्यास कृष्णच शक्ती देत आहे’, असे जाणवणे : माझ्याकडून गुरुमाऊलींना प्रार्थना झाली, ‘संत मीराबाईंनी आपल्या जीवनात अनेक अडचणींना तोंड दिले, तरी त्या आनंदी, प्रसन्न आणि हरिनामात मग्न होत्या. मलासुद्धा तू शक्ती दे आणि तुझ्या नामात रंगू दे.’ त्या वेळी मला संत मीराबाईंचे जीवन आठवले. तेव्हापासून मला प्रसन्न वाटून ‘संघर्ष करण्यास जणू कृष्णच शक्ती देत आहे’, असे जाणवत होते.
३ इ. परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी केलेली आर्त प्रार्थना ! : ‘गुरुमाऊली, मलासुद्धा संत मीराबाईंप्रमाणेच तुमच्या चरणांची भक्ती आणि सेवा करता येऊ द्या. हे सर्व तुम्हीच करवून घ्या; कारण तुम्हाला ठाऊक आहे, ‘मी तुमच्याविना एक पाऊलही चालू शकत नाही. मला संत मीराबाईंप्रमाणे भक्ती करणे तर अशक्यच आहे; परंतु गुरुमाऊली, तुम्ही माझा हात धरा आणि ‘कृष्णभक्ती कशी करायची ? मी कृष्णाला आनंद कसा देऊ शकेन ?’, हे केवळ तुम्हीच सांगा आणि तसे माझ्याकडून करवूनही घ्या’, हीच आपल्या पावन चरणी कळकळीची प्रार्थना !’
– कु. प्रेरणा पाटील (आताच्या सौ. राधिका प्रशांत चव्हाण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.९.२०१८)