प.पू. भक्तराज महाराज यांचे चित्र काढतांना न्यू जर्सी, अमेरिका येथील श्री. सारंग ओझरकर यांना आलेल्या अनुभूती !

१. प.पू. भक्तराज महाराज यांचे चित्र काढण्याचा विचार मनात येणे आणि ‘हा गुरुपौर्णिमेच्या चैतन्यमय वातावरणातून मिळालेला प्रसाद आहे’, असे वाटणे

‘५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) चित्र काढण्याचा विचार मनात आला आणि ‘हा गुरुपौर्णिमेच्या चैतन्यमय वातावरणातून मिळालेला प्रसाद आहे’, असे मला वाटले. प.पू. बाबांचे चित्र काढतांना माझ्या मनावर कोणताही ताण नव्हता. चित्र काढायला विशिष्ट कागद किंवा विशिष्ट पेन्सिल यांची आवश्यकता भासली नाही. ईश्वरीकृपेने मी त्यांचे चित्र अगदी सहजपणे आणि अल्प वेळेत (अंदाजे २५ मिनिटांत) काढू शकलो. चित्र काढून झाल्यावर मला त्यातून पुष्कळ आनंददायी स्पंदने जाणवली.

२. नामजप करतांना मन विचलित झाल्यास प.पू. बाबांचे ‘विठोबा लागो तुझा हा छंद’ हे भजन मनात चालू होणे आणि मन नामजपावर पुन्हा केंद्रित होणे 

साधनेच्या प्रयत्नांत प्रत्येक क्षणी ‘प.पू. बाबा मला मार्गदर्शन करत आहेत अथवा ते माझ्या समवेत आहेत’, अशी अनुभूती येते. नामजप करतांना माझे मन विचलित झाल्यास काही वेळातच प.पू. बाबांचे भजन ‘विठोबा लागो तुझा हा छंद’ हे मनात चालू होते. त्याच वेळी मन नामजपावर केंद्रित होण्यास साहाय्य होते. माझ्या ४ वर्षांच्या मुलीलासुद्धा प.पू. बाबांची भजने ऐकायला आणि त्यांच्या छायाचित्राचे दर्शन घ्यायला आवडते.

३. ‘प.पू. बाबा माझा हात धरून सर्वतोपरी साहाय्य करत आहेत’, असे जाणवणे

पूर्वी मला प.पू. बाबांची भजने ऐकायला आवडत नसत; पण जसे मी साधनेचे प्रयत्न आरंभ केले, तसे प.पू. बाबा आणि त्यांची भजने यांची मला ओढ वाटू लागली. ‘ते माझा हात धरून मला सर्वतोपरी साहाय्य करत आहेत’, असे जाणवते. प.पू. बाबांनी माझ्याकडून चित्र काढून घेतले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता.’

– श्री. सारंग ओझरकर, न्यू जर्सी, अमेरिका.

श्री. सारंग ओझरकर

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चित्र काढतांना श्री. सारंग ओझरकर यांना आलेल्या अनुभूती

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे चित्र काढतांना स्वतःमध्ये स्फूर्ती निर्माण होणे आणि चित्रे पूर्ण झाल्यावर पुष्कळ आनंद वाटणे

‘माझ्या आईने (सौ. निलांबरी ओझरकर, पुणे) मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे चित्र काढण्याविषयी सुचवले. २१.९.२०२० या दिवशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे चित्र पुष्कळ आत्मीयतेने काढले. चित्र काढतांना मला स्त्री-शक्तीची जाणीव होत होती आणि त्याबद्दल आदरही वाटत होता.

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे चित्र काढतांना मला स्वतःमध्ये स्फूर्ती निर्माण होत असल्याचे जाणवले. चित्र चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी माझ्याकडून प्रयत्न होत होते. माझे अक्षर फारसे चांगले नसल्याने चित्राखाली शोभेल, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे नाव कसे लिहावे, हा प्रश्न पडला होता. नंतर देवाच्या कृपेने एक विचार सुचला, ‘पेन्सिलला नागमोडी घासून नाव लिहून पहावे.’ नेहमीप्रमाणे पेन्सिल उभी धरून लिहिल्याने अक्षर तितकेसे सुबक आणि ठळक दिसत नव्हते. त्यामुळे पेन्सिलचे शिस घासून ती तिरपी धरून लिहिल्याने अक्षर ठळक आणि नागमोडी आले. अशा पद्घतीने लिहिलेले नाव चांगले दिसत होते. चित्रे काढून पूर्ण झाल्यावर मला पुष्कळ आनंद वाटत होता.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे चित्र काढतांना माझ्यातील प्रेरणा कायम राहून चित्र काढतांना येणार्‍या अडचणींवरही मात करता येणे

यापूर्वी चित्र काढतांना माझ्यातील सातत्य न्यून होऊन मी चित्र काढणे अर्धवट सोडून देत असे; परंतु श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे चित्र काढतांना माझ्यातील प्रेरणा कायम राहिली. त्याचप्रमाणे चित्र काढतांना मला येणार्‍या अडचणींवरही मात करता आली. या वेळी माझ्या पत्नीने चित्रात दाखवलेल्या चुका मला स्वीकारता आल्या. तसेच आईच्या आदेशाचे आत्मीयतेने पालनही करता आले.

हे चित्र श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी हाती घेतलेले गुरुकार्य असेच अखंड चालू राहो आणि त्यांचे आशीर्वाद आम्हास लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना अन् कृतज्ञता !’

– श्री. सारंग ओझरकर, न्यू जर्सी, अमेरिका.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक