कर्नाटकातील युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या सुरय्या अंजुम यांचा हिजाबची मागणी करणार्यांना घरचा अहेर !
धर्म घरी पाळा, शिक्षणात आणू नका !
‘महाविद्यालयात हिजाब घालून येण्याची अनुमती द्या’, अशी मागणी करणार्या काँग्रेसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – भारताने प्रत्येकाला धर्माचरणाची संधी दिली आहे; परंतु धर्माचरण हे घरातच करावे. घरातून बाहेर गेल्यावर ‘मी एक भारतीय आहे’, हे आपण जाणले पाहिजे, असा घरचा अहेर कर्नाटकातील युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या सुरय्या अंजुम यांनी काँग्रेस आणि महाविद्यालयात हिजाब घालण्याची मागणी करणार्या मुसलमान विद्यार्थिंनीना दिला आहे. त्यांच्या या विधानांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिंनींना हिजाब घालून येण्याची अनुमती देण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. या पार्श्वभूमीवर अंजुम यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Karnataka: Congress leader asks students to focus on education https://t.co/n34H5isruD
— TOI Cities (@TOICitiesNews) February 8, 2022
सुरय्या अंजुम यांनी मांडलेली सूत्रे
१. राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होत आहे !
हिजाब माझा हक्क आहे. हिजाब माझ्या धर्माचे प्रतीक आहे. देशाने माझा हक्क वापरण्याची मोकळीक दिली आहे; परंतु आपल्या राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा आपण दुरुपयोग करत आहोत.
२. धर्मापेक्षाही माझा देश मोठा आहे !
विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी अभिमान न्यून होणे, हेच शिक्षणसंस्थांमध्ये धर्माच्या विचारावर निदर्शने होण्यामागचे मुख्य कारण आहे. शिक्षणापेक्षा दुसरा कोणताही धर्म मोठा नाही. धर्मापेक्षाही माझा देश मोठा आहे.
३. विद्यार्थ्यांनी गणवेश धारण केला पाहिजे !
विद्यार्थिनी सध्या ‘हिजाब घालूनच जाणार’, असा हट्ट करत आहेत. शाळेच्या कार्यकारी मंडळाने ‘बुरखा किंवा हिजाब घालून येऊ नका’, असे कधीच सांगितलेले नाही; परंतु ‘वर्गात तुम्ही हिजाब घालू नका’, असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे अनेक वर्षांपूर्वीच भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये गणवेश लागू करण्यात आला आहे. ‘गणवेश’ या शब्दातच ‘आपण सर्व समान आहोत’, असा अर्थ आहे; म्हणूनच विद्यार्थ्यांनी गणवेश धारण केला पाहिजे.
४. शिक्षणसंस्थेत धर्म आणणे, ही मोठी चूक !
शिक्षण घ्यायला आलेले आपण राजकारणाने प्रेरित होऊन धर्माला उचलून धरत आहोत. हे पुढील १० वर्षांत देशाला मारक ठरणार आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. देशाचे भविष्य धर्माच्या नावाखाली बिघडवत आहोत. हिजाब घालून धर्माचरण करा; परंतु शिक्षणसंस्थेत धर्म आणणे, ही मोठी चूक आहे.
५. हिजाब हवा असेल, तर इस्लामी महाविद्यालयात जा !
आता शिक्षण अनिवार्य आहे. येथे अनुमती नसल्यास हिजाब काढून बसा. तुम्हाला धर्मच महत्त्वाचा वाटत असल्यास आपल्याकडे पुष्कळ इस्लामी महाविद्यालये आहेत. तिथे हिजाबला अनुमती देतात. तुम्ही तेथे जावे.
६. बांगड्या आणि कुंकू हे अलंकार असून त्यांचा धर्माशी संबंध नाही !
‘हिंदु विद्यार्थिनी बांगड्या आणि कुंकू लावून येतात’, असा आरोप करता; परंतु ते धर्माशी संबंधित नाहीत. त्या अलंकारिक वस्तू आहेत.
७. उद्या ५ वेळा नमाजपठणाचीही मागणी होईल !
आज हिजाब आणि भगवे उपरणे यांसाठी निदर्शने होत आहेत. उद्या ‘५ वेळा नमाजपठण करण्यासाठी अनुमती द्यावी’; म्हणून निदर्शने कराल. अशा रीतीने मागण्या वाढतच जातील, न्यून होणार नाहीत. कृपाकरून तुम्ही वर्गात समानतेला मान द्या.