काँग्रेसच्या काळात गोव्यात सर्वाधिक घोटाळे ! – गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
पणजी, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – काँग्रेसच्या काळात गोव्यात सर्वाधिक घोटाळे झाल्याचा आरोप आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळे लोकांनी पाहिले आहेत. अनधिकृत खाण व्यवसाय प्रकरणात न्यायमूर्ती शहा आयोगाने ३५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाला खाणी बंद कराव्या लागल्या. काँग्रेस काळातील एका सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या कुटुंबातील सदस्य बांधकाम कंत्राटदाराकडून पैसे उकळत होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम् यांनी ते केंद्रीयमंत्री असतांना गोव्यासाठी किती निधी दिला, हे त्यांनी स्पष्ट करावे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही गोव्यासाठी काहीच दिलेले नाही. यामुळे काँग्रेसच्या दिशाभूल करणार्या प्रचाराला लोकांनी बळी पडू नये.’’ बराच काळ काँग्रेसचे नेते राहिलेले मंत्री विश्वजीत राणे यांनी वर्ष २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.