तथाकथित पुरोगामी यांच्या दांभिक प्रसारामुळे खरा इतिहास दडपला जात आहे ! – किरण नाकती, शिवसेना उपविभागप्रमुख, ठाणे
ठाणे, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – आपला इतिहास आणि ऐतिहासिक वारसा या विषयाची उदासीनता भारत सोडून अन्य कुठल्याही देशात नसेल. हिंदूंमध्ये जागृती निर्माण करणे, ही काळाची आवश्यकता आहे. आताच आपण जागृत होऊन राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती कृतीशील झालो नाही, तर उद्या आपण अल्पसंख्यांक होऊ. तथाकथित पुरोगामी यांच्या दांभिक प्रसारामुळे खरा इतिहास दडपला जात आहे; परंतु आम्ही तो समाजासमोर आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नरत राहू, असे उद्गार शिवसेनेचे ठाणे येथील उपविभागप्रमुख श्री. किरण नाकती यांनी ‘अभिनय कट्टा’ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचे मनोगत व्यक्त करतांना काढले. श्री. किरण नाकती यांच्या पुढाकाराने अभिनय कट्टयाच्या माध्यमातून ७३व्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून ‘भारताचा गौरवशाली इतिहास’ या विषयाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आपला गौरवशाली इतिहास शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवला जात नाही ! – अतुल देव, हिंदु जनजागृती समिती
या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल देव म्हणाले की, भारताला अतिशय अभिमानास्पद असा गौरवशाली इतिहास लाभलेला असतांनाही भारतीय मात्र त्याविषयी अनभिज्ञ आहेत. कारण खरा इतिहास शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवला जात नाही. लोकमान्य टिळक, नेजाती सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार उधमसिंह, भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांसारख्या अनेक क्रांतीकारकांनी सशस्त्र क्रांती केली. त्यांच्या दबावामुळे इंग्रजांना देश सोडून जाणे भाग पडले. ही वस्तूस्थिती असतांना आम्हाला शिकवले जात की, स्वातंत्र्य हे अहिंसक आंदोलनातून प्राप्त झाले. इतिहासाच्या विकृतीकरणाचे दूरगामी परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आज भारतियांमध्ये स्वधर्म, स्वभाषा, संस्कृती या संदर्भात न्यूनगंड आहे. यामध्ये पालट घडवून भारताचा जाज्ज्वल्य इतिहास जगासमोर मांडण्यासाठी तळमळीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी कृतीशील होऊया !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष असलेले गड-दुर्ग यांची आज दुरवस्था झाली आहे. पुरातत्व खाते आणि सरकार यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक गड-दुर्ग यांचे बुरूज ढासळलेले आहेत. तेथील मंदिरे, वास्तू, मावळ्यांची स्मारके जीर्ण झाली किंवा पडलेली आहेत. अनेक गड-दुर्ग यांवर धर्मांधांनी थडगी अथवा मजार बांधून ताबा मिळवला आहे. गडावर अनधिकृत वस्त्या वसवल्या आहेत. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी आपण कृतिशील व्हायला हवे, असे श्री. देव यांनी सांगितले. |