हिजाबप्रेमींना आवर घाला !

संपादकीय 

स्वतःचे वेगळेपण जोपासणारे अल्पसंख्य हे भारतीय समाजाशी एकरूप काय होणार ?

कर्नाटकातील काही ठराविक महाविद्यालयांमधील धर्मांध विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात येण्याचा हट्ट केला. यामुळे केवळ कर्नाटकच नव्हे, तर देशातील वातावरण तापू लागले आहे. शाळा आणि महाविद्यालये ही समानता शिकवण्याची केंद्रे आहेत. त्यामुळे तेथे मुला-मुलींना ‘गणवेश’ असतो; म्हणजे सर्वांनी एकसमान कपडे परिधान करून येणे आवश्यक असते. असे केल्याने ‘आम्ही सर्व समान आहोत’, ही वृत्ती मुलांच्या अंगी बाणवली जाते. गणवेश परिधान करण्यामागील हे एक ढोबळ कारण सांगितले जाते; मात्र ‘आम्ही अल्पसंख्य, आम्ही जगापासून वेगळे’, हे दाखवण्याची धर्मांधांची दुराग्रही वृत्ती त्यांच्या पुढील पिढीमध्येही दिसू लागली आहे. हिजाब परिधान करून शाळा-महाविद्यालयांमध्ये येण्याची मागणी करणे, हा त्यातीलच एक भाग. ‘हिजाब परिधान करणे, हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे’, या आविर्भावात या धर्मांध विद्यार्थिनी महाविद्यालयीन व्यवस्थापनाशी भांडतांना दिसत आहेत. भारतात एकीकडे तीन तलाकविरोधी कायदा आणून मुसलमान महिलांचे सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून चालवले जात आहेत; मात्र या महिलांना या जोखडातून खरंच बाहेर पडायचे आहे का ? भारतात मुसलमान स्त्रियांची ‘मुकी बिचारी कुणीही हाका’, अशी प्रतिमा रंगवली जाते. ‘मुसलमान महिला मुले जन्माला घालायची यंत्रे झाली आहेत’, ‘बुरखा परिधान करून वावरणार्‍या या महिलांचे आयुष्य नरकसमान आहे’, असे त्यांच्या संदर्भात दीन आणि अबला असल्याचे चित्र रंगवले जाते; मात्र ‘परिस्थिती खरोखरच तशी आहे का ?’, हा प्रश्न येथे उपस्थित होतो. काळा बुरखा घालून, हिजाब घालून या महिलांना मिरवण्याची हौस आहे, हेच वास्तववादी चित्र आहे. त्यामुळे मुसलमान महिला चळवळीचे भविष्य काय आहे, हे त्याच जाणोत ! येथे प्रश्न आहे तो भारतातील स्वयंघोषित स्त्रीमुक्तीवादी, पुरोगामी आणि बुद्धीजीवी यांचा ! भारतात स्त्री सक्षमीकरणाचे वारे वेगात वहात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘भारतातील स्त्रीमुक्तीवादी, पुरोगामी आणि बुद्धीजीवी पुढे येऊन या धर्मांध मुलींचे कान पिळतील’, असे वाटले होते; मात्र ही टोळी भलतीच ‘धार्मिक’ निघाली. ‘या मुलींनी हिजाब परिधान करणे, हे त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य आहे’, असा टाहो या टोळीकडून फोडला जात आहे. अन्य वेळी ‘कुंकू लावणे’, ‘मंगळसूत्र घालणे’, ‘साडी नेसणे’ ही बंधने आहेत. हे बुरसटलेले रितीरिवाज आहेत’, अशी ओरड मारणारे हे पुरोगामी या वेळी मात्र धार्मिकतेचा राग आळवू लागले आहेत. हिजाबप्रेमींचा हा दुटप्पीपणा संतापजनक आहे.

धर्मस्वातंत्र्य नव्हे धर्मांधता !

कर्नाटकातील हिजाब प्रकरणात ‘शिक्षण’ हा केंद्रबिंदू ठेवून चर्चा होणे आवश्यक होते; मात्र धर्मस्वातंत्र्य आणि तेही मुसलमान महिलांच्या कथित धर्मस्वातंत्र्यावर अधिक चर्चा होऊ लागली आहे. सौदी अरेबियासारख्या इस्लामचे प्रतिनिधित्व करणार्‍या देशातील महिला ‘बुरखा’ फेकून ‘स्वातंत्र्य’ अनुभवण्यासाठी चळवळी राबवत आहेत, तसेच ‘नो टू बुरखा’, ‘नो टू हिजाब’ यांसारख्या चळवळी राबवून महिला सक्षमीकरणासाठी हाक दिली जात आहे. याउलट कर्नाटकातील हिजाब प्रकरणानंतर केरळमधील मुसलमान महिला स्त्रीमुक्ती आंदोलनाची कार्यकर्ती फातिमा थालिया हिने ‘बुरखा चळवळ’ राबवण्याची घोषणा केली आहे. जे अन्य इस्लामी राष्ट्रांतील महिलांना ‘नकोसे’ किंवा ‘स्वातंत्र्याच्या आड येणारे’ वाटते, ते भारतातील मुसलमान महिलांना ‘हवेहवेसे’ का वाटते ?’, हा प्रश्न कुणी विचारत नाही किंवा याविषयी विचार करण्याची कुणी तसदीही घेत नाहीत. मुसलमान स्त्रीमुक्ती आंदोलनाची आणि ‘हिजाब चळवळी’ला प्रोत्साहन देणार्‍यांची भंपकता यातून दिसून येते. महाविद्यालयीन धर्मांध तरुणींमधील धार्मिक स्वातंत्र्याची जाणीव मागील काही दिवसांत ‘अचानक’ मोठ्या प्रमाणात कशी काय जागृत झाली ? याचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. धार्मिक स्वातंत्र्यापायी नव्हे, तर त्यांच्यातील धर्मांधता वाढल्याचे हे लक्षण आहे. या मुलींच्या धार्मिक हक्कांविषयी कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. ‘तुम्हाला (मुसलमान महिलांना) मशिदीमध्ये प्रवेश करण्याची अनुमती नाही. तो हक्क मिळण्यासाठी तेथे जाऊन लढा. असे वादविवाद शिक्षणक्षेत्रात नका’, हे श्री. नागेश यांनी केलेले वक्तव्य बरेच काही सांगून जाते.

मुसलमान सुधारणावादी कुठे आहेत ?

रज्जाब आणि हाजी अब्दुल मजीद

कर्नाटकात हिजाब प्रकरण तापल्यानंतर काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयाजवळ पोलिसांनी रज्जाब आणि हाजी अब्दुल मजीद या धर्मांधांना शस्त्रांसह अटक केली. जर या विद्यार्थिनी स्वतःच्या कथित हक्कांसाठी लढत असतील, तर तेथे शस्त्रधारी धर्मांधांचे काय काम ? या घटनेकडे हिजाबप्रेमी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुसलमान स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणार्‍या झाकिया सोमण यांच्यासाख्या स्त्रीमुक्तीवादीही हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणार्‍या मुलींने समर्थन करतात, त्या वेळी अशांच्या मुसलमान स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या ध्येयधोरणांविषयी मनात साशंकता निर्माण होते. ‘या मुलींनी हिजाब परिधान केला नाही, तर त्यांचे पालक त्यांना महाविद्यालयात पाठवणार नाहीत’, असे स्पष्टीकरण झाकिया सोमण देतात. मुसलमान स्त्रीमुक्ती आंदोलन कशासाठी आहे ? ‘मुला-मुलींनी सर्वांसारखा गणवेश परिधान करून एकत्वाची भावना जोपासणे आवश्यक असल्याने मुलींना नेहमीच्या गणवेशात शाळेत पाठवा’, याची जाणीव मुसलमान सुधारणावादी त्यांच्या समाजात रुजवू शकलेले नाहीत. हा जाब या मुसलमान सुधारणावाद्यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्यांकांची धार्मिकता ही धर्मांधता असते. ती समजून घेण्यात समाजधुरिणी नेहमी चुकतात किंवा ते समजून घेण्याची त्यांची इच्छा नसते.

आज महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याचे समर्थन करणारे उद्या बुरखा घालून येण्याचे समर्थन करतील. हिजाबप्रेमींच्या धर्मांध कारवायांना ऊत आल्यामुळे केंद्र सरकारने सक्षम कायदा करून त्यांना आवर घालणे, हेच इष्ट ठरणार आहे !