साधनेची तीव्र तळमळ असलेल्या आणि मुलांवरही साधनेचे संस्कार करणार्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. नेहा प्रभु (वय ४३ वर्षे) !
माघ शुक्ल पक्ष षष्ठी (६.२.२०२२) या दिवशी सौ. नेहा प्रभु यांचा तिथीने ४३ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी त्यांची मुलगी कु. मानसी प्रभु आणि मुलगा कु. मुकुल प्रभु यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. मानसी प्रभु (मुलगी) (वय २० वर्षे)
१. मुलीवर साधनेचे संस्कार करणे
‘माझ्या आईला (सौ. नेहा प्रभु ह्यांना) पहिल्यापासूनच साधना आणि सेवा यांची तळमळ आहे. त्यामुळे ती माझ्याकडूनही तळमळीने साधना करवून घेते. तिने माझ्यावर लहानपणापासूनच साधनेचे संस्कार केले. मी शाळेत जातांना बस येईपर्यंत ती मला नामजप आणि प्रार्थना करायला सांगायची. ती माझ्याकडून भावप्रयोगही करवून घ्यायची.
२. प्रेमळ
२ अ. कुणी कसेही वागले, तरी सर्वांशी प्रेमानेच वागणे : आमच्या घरातील कुणी तिच्याशी नीट बोलायचे नाहीत किंवा तिची मस्करी करायचे; परंतु आई त्यांच्याविषयी मनात राग ठेवत नसे. ती सर्वांशी प्रेमाने बोलायची आणि त्यांची काळजी घ्यायची.
२ आ. सहसाधकांशीही प्रेमानेच वागणे : आश्रमात सहसाधकांच्या समवेत कोणताही प्रसंग घडला, तरी तिचे त्यांच्या समवेतचे वागणे किंवा बोलणे पालटत नाही. ती सर्वांशी प्रेमानेच बोलते. आई सर्वांवर फार प्रेम करते. माझ्या काही मैत्रिणीही तिला ‘आई’ म्हणूनच हाक मारतात.
अशीच शिकवण तिने मला आणि माझा लहान भाऊ मुकुल यालाही दिली आहे. ‘कुणी कसेही वागले, तरी आपण आपली वागणूक पालटायची नाही’, असे ती म्हणते.
३. शांत स्वभाव
बर्याचदा माझी आईवर चिडचिड होते, तरी ती माझ्याशी प्रेमानेच बोलते आणि मला माझ्या चुकीची जाणीव करून देते. आई शांत राहून आणि प्रेमाने बोलत असल्यामुळे मला ‘माझी अनावश्यक चिडचिड होत आहे’, याची आपोआप जाणीव होते.
४. मुलीची आध्यात्मिक मैत्रीण होऊन तिला साधनेत साहाय्य करणे
मला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर ती अनेक उदाहरणे सांगून मला त्यातून बाहेर काढण्यासाठी साहाय्य करते. ‘मी त्या प्रसंगातून बाहेर पडावे, याची माझ्यापेक्षा आईलाच अधिक तळमळ आहे’, असे मला जाणवते. आई मला साधनेत ‘एक मैत्रीण’ या भावानेच साहाय्य करते. ‘आई, म्हणजे देवाने मला दिलेली एक सुंदर भेट आहे’, असे मला वाटते.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
‘आईला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी पुष्कळ काही केले आहे’, असे म्हणून ती बराच वेळ कृतज्ञता व्यक्त करत असते.
६. अनुभूती – देवाला मनापासून आळवल्यावर अपेक्षित व्यक्तीची भेट होणे
तिला कुणाला निरोप द्यायचा असेल किंवा कुणाशी सेवेविषयी काही बोलायचे असेल, तेव्हा ती लगेच देवाला सांगते, ‘देवा, मी या साधकाला कुठे शोधू ?’ तेव्हा तिच्या मनात ज्यांचा विचार येतो, ती व्यक्ती किंवा साधक आपोआप तिच्या समोर येतो. त्याचे तिलाही आश्चर्य वाटते. त्या वेळी ‘तिच्यासाठी कृष्ण धावून आला’, याची जाणीव होऊन तिला कृतज्ञता वाटते.’
कु. मुकुल प्रभु, (मुलगा) (वय १० वर्षे)
प्रेमभाव
‘आईला त्रास होत असतांना मलाही बरे वाटत नसेल, तर ती स्वतःचा विचार न करता माझी फार काळजी घेते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २२.१.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |