लोकशाही – यथा प्रजा, तथा राजा ?
लोकशाही कि भ्रष्टशाही ?
सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !
सध्याचे भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. गेल्या ७४ वर्षांत अशा अनेक निवडणुका झाल्या, जनतेला विविध आश्वासने दिली गेली; परंतु प्रत्यक्षात जनतेचा भ्रमनिरासच झाला. या पार्श्वभूमीवर लोकशाहीतील त्रुटी, प्राचीन भारतीय आदर्श राज्यव्यवस्था आदींविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने याविषयीची लेखमालिका प्रसिद्ध करत आहोत. आतापर्यंत आपण ‘स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील आदर्श पितृतुल्य शासनव्यवस्था, भारतातील लोकशाहीची शोकांतिका आणि लोकशाही कि घराणेशाही ? आदी विषयांवरील सूत्रे वाचली. आता ‘लोकशाही – यथा प्रजा, तथा राजा ?’ याविषयीची सूत्रे येथे देत आहोत.
लोकशाहीत एखाद्या नेत्याला दोष देतो, तेव्हा त्याला जनताच कारणीभूत असते !
‘आपल्या देशात प्राचीन काळापासून ‘यथा राजा तथा प्रजा’ ही म्हण प्रचलित आहे.
‘राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः ।
राजानमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजाः ।।’
– चाणक्यनीती, अध्याय १३, श्लोक ८
आर्य चाणक्य यांनी पूर्वीच्या राज्यव्यवस्थेच्या संदर्भात वरील श्लोक लिहिला आहे. त्याचा अर्थ आहे – ‘राजा (प्रशासक) जर धार्मिक असेल, तर प्रजा धार्मिक होते. तो दुराचारी असेल, तर जनता दुराचारी होते. जर तो (सर्वांशी) सारखा वागत असेल, तर ती पण तशीच वागते. माणसे नेहमी राजाप्रमाणेच वागतात.’ याप्रमाणेच महाभारतातही भीष्माचार्यांनी ‘राजा कालस्य कारणम् ।’ (अर्थ : राजा हाच काळाचे कारण आहे) असे म्हटले आहे.
स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात राजेशाही होती. राजघराण्यातून राजाची निवड केली जात असे. त्या राजाने ठरवून दिलेल्या राज्याच्या धोरणांचे पालन प्रजा करत असे, त्यामुळे त्या काळात ‘यथा राजा तथा प्रजा’ ही म्हण योग्य होती; परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारली. यात जनतेच्या मतांमुळे लोकप्रतिनिधी, एका अर्थाने राजा निवडण्यास प्रारंभ झाला. या लोकप्रतिनिधींच्या संख्याबळानुसार बहुमत असलेला पक्ष सरकार स्थापन करून राज्यव्यवस्था चालवतो. त्यामुळे पूर्वीची म्हण पालटून आता ‘यथा प्रजा तथा राजा’ असे म्हणावे लागेल. जर आपण निवडलेला लोकप्रतिनिधी सुशिक्षित, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि देशहिताला प्राधान्य देणारा असेल, तर जनता सुखी, समृद्ध, स्वस्थ रहाण्यासह देशही सर्वोच्च शिखरावर असतो. याउलट जर निवडलेला लोकप्रतिनिधी कुसंस्कारी, अपराधी, माफिया आणि देशद्रोही असेल, तर त्याला निवडून देणारी जनताही त्याचे दुष्परिणाम भोगत असते अन् देश रसातळाला पोहोचलेला असतो. त्यामुळे लोकशाहीत जेव्हा आपण एखाद्या नेत्याला किंवा मंत्र्याला दोष देतो, तेव्हा प्रत्यक्षात तो दोष त्याला निवडून देणार्या जनतेलाच जातो.
(क्रमशः)
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.