संभाजीनगर येथे एम्.आय.एम्. पक्षाने शहरात लावलेले फलक महापालिकेने रातोरात काढले !
संभाजीनगर – शहरात ‘पंतप्रधान आवास योजने’चे काम ठप्प आहे, असा आरोप ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी करून एम्.आय.एम्. पक्षाने ६ फेब्रुवारी या दिवशी शहरातील प्रमुख ठिकाणी तसे फलक लावले होते. केंद्र सरकारची ही योजना संभाजीनगर येथे अपयशी ठरल्याचा आरोप करून जलील यांनी याची अपर्कीती उत्तरप्रदेशातही करणार आहे, अशी चेतावणी दिली; मात्र शहरात लावण्यात आलेले हे फलक महानगरपालिकेने रातोरात काढून टाकले.
‘शहरात कोणत्याही राजकीय पक्षांचे फलक लावू नयेत’, असा महापालिकेचा नियम आहे; मात्र या नियमाची कार्यवाही ठराविक वेळेलाच होतांना दिसते; पण ‘एम्.आय.एम्.’चे फलक काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सुटीच्या दिवशीही आले होते’, असा आरोप ‘एम्.आय.एम्.’च्या वतीने करण्यात आला आहे. आता घरकूल योजनेचे सूत्र आणखी आक्रमकपणे लावून धरण्यात येईल, अशी चेतावणी ‘एम्.आय.एम्.’ने दिली आहे.