एस्.टी.च्या शेकडो प्रशिक्षणार्थ्यांकडून नियुक्तीसाठी परिवहनमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन !

 

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनकर्ते 

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २०१९ या वर्षी विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवून १ सहस्र ८०० जणांना प्रशिक्षण दिले होते; मात्र गेली २ वर्षे या प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती करून घेतली नाही. त्यामुळे नियुक्तीच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थ्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले.

या आंदोलकांमध्ये चालक, वाहक, साहाय्यक, टेक्निशियन यांचा समावेश होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परब यांच्या घराबाहेर पोलिसांचा पुष्कळ प्रमाणात बंदोबस्त होता.


एस्.टी.च्या विलीनीकरणावर दोन दिवसांत अहवाल !

एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेला संप अजूनही संपलेला नाही. या महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करायचे कि नाही यासंदर्भातील अहवाल २ दिवसांत येणार आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. या अहवालानुसार राज्य सरकार एस्.टी. महामंडळाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेणार आहे.