सनातनचे युवासाधक कु. हेरंब उदय धुरी यांच्या हस्ते पार पडले त्यांच्या शाळेत ध्वजारोहण !
नवी मुंबई – इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या ‘नवी मुंबई हायस्कूल, वाशी’ येथे प्रजासत्ताकदिन देशभक्तीपर वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा सनातनचे युवासाधक कु. हेरंब उदय धुरी यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम ऑनलाईन दाखवण्यात आला. या वेळी शिक्षकांनी जन-गण-मन हे राष्ट्रीय गीत म्हटले. या प्रसंगी व्यासपिठावर शिशु विद्यालय, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. सुरेखा कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने झाली.
इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वाशी हायस्कूलने २०२०-२१ या वर्षीच्या १० वी इयत्तेत ९९.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आलेल्या कु. हेरंब धुरी यांची निवड या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून केली होती. कु. हेरंब धुरी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. वर्ष २०१६ मध्ये कु. हेरंबची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. कु. हेरंब हा हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांचा मुलगा आहे. |
तरुण पिढीच्या नसानसांमध्ये देशभक्ती निर्माण झाली, तर त्यातूनच खरा ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण होईल ! – कु. हेरंब धुरीईश्वराच्या कृपेने आणि गुरुजनांच्या आशीर्वादानेच मला माझ्या शाळेत राष्ट्रध्वज फडकावण्याची संधी मिळाली. यासाठी मी ईश्वर आणि गुरुजन यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. क्रांतिकारकांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यातून आपला देश घडवण्यासाठी आमची पिढी प्रेरणा घेत आहे. सामाजिक माध्यमांतून आणि प्रत्यक्षातही अनेक तरुण देशभक्तीपर कार्य करत आहेत. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ या प्रभु रामचंद्रांच्या वचनाप्रमाणे ‘ही भारतमाता मला स्वर्गापेक्षा ही श्रेष्ठ आहे.’ आजच्या तरुण पिढीच्या रक्तात आणि नसानसांमध्ये देशभक्ती निर्माण झाली, तर त्यातूनच खरा ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण होईल. |