नाशिक येथे गॅस गिझर गळतीमुळे स्नानगृहात वैमानिक रश्मी गायधनी यांचा मृत्यू !
नाशिक – येथे गॅस गिझरच्या गळतीमुळे ज्येष्ठ वैमानिक रश्मी गायधनी यांचा मृत्यू झाला आहे. त्या मुंबई येथील एअर इंडियामध्ये ज्येष्ठ वैमानिक होत्या. अंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे स्नानगृहात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. मुंबई येथून त्या येथे रहाणार्या स्वतःच्या आई वडिलांना भेटण्यासाठी आल्या असतांना ही दुर्दैवी घटना घडली. ज्येष्ठ लेखिका सुमन मुठे आणि सेवानिवृत्त वनाधिकारी मारोती मुठे हे रश्मी गायधनी यांचे आई-वडील आहेत.
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत अधिक चौकशी केली आहे. गॅस गिझर गळतीमुळे याआधीही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे गिझर हाताळतांना अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन पोलीस आणि तज्ञ यांनी केले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.