स्वैराचाराचे समर्थन करून समाजव्यवस्था मोडकळीस आणणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’ला हद्दपार करूया ! – सौ. विजया वेसणेकर, हिंदु जनजागृती समिती

कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या  सौ. विजया वेसणेकर

मौजे सांगाव (जिल्हा कोल्हापूर), ७ फेब्रुवारी (वार्ता.) – पाश्चात्त्य विकृतीशी संबंधित असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आजची तरुण पिढी भरकटत आहे. अशा प्रकारचे ‘डे’ हे युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र असून यामागे मोठ्या आस्थापनांचे छुपे अर्थकारणही लपलेले आहे. यामुळे आर्थिक हानीसह या देशातील भारतीय संस्कृतीची अपरिमित हानी अशा चुकीच्या ‘डे’मुळे होत आहे. तरी स्वैराचाराचे समर्थन करून समाजव्यवस्था मोडकळीस आणणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’ला हद्दपार करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर यांनी केले. मौजे-सांगाव येथे ६ फेब्रुवारी या दिवशी ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी एकत्र जमलेल्या महिलांसमोर त्या बोलत होत्या.

या वेळी सौ. वेसणेकर यांनी हळदी-कुंकू समारंभाचे महत्त्व, रथसमप्तीचे महत्त्व यांविषयीही माहिती दिली. याचा लाभ १०० महिलांनी घेतला. ‘नमो बचत गटा’च्या अध्यक्षा सौ. माया दिलीप पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सौ. भारती पाटील यांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली. व्याख्यानाचा विषय आवडला आणि अशाच प्रकारचे व्याख्यान सर्वत्र व्हायला हवे, असे कार्यक्रम झाल्यावर अनेक महिलांनी सांगितले.

विशेष

१. कु. समीक्षा पाटील या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या युवतीने व्याख्यान झाल्यावर प्रत्यक्ष भेटून शंकांचे निरसन करून घेतले, तसेच युवतींसाठी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.

२. ‘सरस्वती इंग्लिश स्कूल’च्या शिक्षिका सौ. रूपाली पाटील यांनी महिलादिनाच्या निमित्ताने शाळेत पालकांसाठी असलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात विषय मांडण्यासाठी बोलावले आहे. त्यांनी त्यांच्या घरीही अशाच प्रकारचा कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले.