‘ईश्वरावर श्रद्धा असणार्‍या व्यक्तीच्या हाकेला धावून जायला ईश्वरही सदैव तत्पर असतोच’, असा भाव असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या वणी (जिल्हा यवतमाळ) येथील होमिओपॅथी वैद्या सौ. स्वाती देशमुख !

‘संपूर्ण जगाचे रहाटगाडगे हे ईश्वराच्या इच्छेनेच चालत असते. आधुनिक वैद्य हात टेकतात, त्या वेळी आपल्याला केवळ परमेश्वराचाच आधार असतो. ‘तो नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढील’, याची आपल्याला निश्चिती असते. संकटसमयी निश्चितच आपल्याला ईश्वराविना तरणोपाय नसतो आणि ज्या व्यक्तीची ईश्वरावर श्रद्धा असते, तिच्या हाकेला धावून जायला परेमश्वरही सदैव तत्पर असतोच. मला अनेक प्रसंगांत ईश्वराची कृपा अनुभवता आली. त्यातील काही प्रसंग पुढे दिले आहेत.

सौ. स्वाती देशमुख

१. ‘कुलदेवतेचे दर्शन करून परत जातांना मार्ग पुष्कळ खराब असल्यामुळे वेळेत घरी पोचणे शक्य नाही’, असा विचार येणे, देवाला प्रार्थना केल्यावर एका अनोळखी व्यक्तीने सांगितलेल्या मार्गावरून गेल्यावर वेळेत अन् सुखरूप घरी पोचणे

प्रतिवर्षी आम्ही आमचे कुलदैवत श्री व्यंकटेशाच्या दर्शनाला वाशिम (जिल्हा यवतमाळ) येथे जातो. मागील वर्षीही आम्ही तेथे गेलो होतो. मार्ग पुष्कळ खराब असल्यामुळे आम्हाला तेथे जाण्यास पुष्कळ वेळ लागला. संध्याकाळच्या आत घरी पोचायचे असल्यामुळे त्याच मार्गाने परत जाणे शक्य नव्हते. मी मनात देवाचा धावा चालू केला. आम्ही एका दुकानात थांबलो होतो. तिथे आम्ही परत जाण्याविषयी बोलत होतो. आमचे बोलणे तेथे असलेल्या एका व्यक्तीने ऐकले आणि तिने स्वतःहून आम्हाला परत जाण्यासाठी नवीन मार्ग सुचवला. ती व्यक्ती आणि तो मार्ग आमच्यासाठी अनोळखी होता; परंतु देवावर विश्वास ठेवून आम्ही निघालो. अतिशय चांगला आणि वाहतूक नसलेल्या त्या मार्गाने गेल्याने आम्ही संध्याकाळच्या आत सुखरूप घरी पोचलो. जणू त्या व्यक्तीच्या रूपात आम्हाला देवच भेटला होता.

२. भावाला कोरोनाचा संसर्ग झाल्यावर त्याने कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने आणि दत्तस्तोत्र म्हटल्याने त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होणे

काही मासांपूर्वी माझा भाऊ कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात भरती होता. त्या काळात त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती. तेव्हा मी त्याला भ्रमणभाषवरून कुलदेवतेचे नामस्मरण आणि दत्तस्तोत्र यांविषयी सांगितले. याचा त्याला चांगलाच लाभ झाला. त्याची भीती नाहीशी होऊन त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली आणि लवकरच तो रुग्णालयातून घरी आला.

३. मुलीचे पोट दुखत असतांना तिला औषध देणे आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून नामजप केल्यामुळे अर्ध्या घंट्यातच तिची पोटदुखी थांबणे

एकदा माझ्या मुलीची प्रकृती अकस्मात् बिघडली. तिला चक्कर येत होती आणि तिचे पोट दुखत असल्याने ती वेदनांनी तळमळत होती. आमच्या घरापासून रुग्णालय दूर आहे, तसेच कोरोनाच्या काळात रुग्णालयात जाणे आम्हाला नकोसे वाटत होते. मी होमिओपॅथी वैद्या असल्याने मुलीला औषध दिले आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून सतत नामजपही चालू ठेवला. मुलगी अर्ध्या घंट्यातच एकदम ठणठणीत बरी झाली.

– होमिओपॅथी वैद्या (सौ.) स्वाती देशमुख, यवतमाळ (२२.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक