गोवा विधानसभा निवडणुकीतील ३०१ पैकी ८० उमेदवारांवर गुन्हे प्रविष्ट
२९ उमेदवारांवर आरोप निश्चित, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली
पणजी, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे प्रविष्ट झालेले आहेत. यामधील २९ जणांवरील आरोप निश्चित झाले आहेत, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.
सर्वाधिक गुन्हे नोंद असलेले उमेदवार काँग्रेसमध्ये
काँग्रेसच्या ३७ उमेदवारांपैकी १७, भाजपच्या ४० पैकी १२, ‘आप’च्या ३९ पैकी ९, तृणमूल काँग्रेसच्या २६ पैकी ७, ‘मगोप’च्या १३ पैकी ६, ‘रिव्हॉल्यूशनरी गोवन्स’च्या ३८ पैकी ५, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ पैकी ४, तसेच गोवा फॉरवर्ड, ‘गोयंचो स्वाभिमान पक्ष’, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांचा प्रत्येकी उमेदवार एक, तसेच अपक्ष ६८ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे प्रविष्ट झालेले आहेत. ४० पैकी ३७ मतदारसंघांत गुन्हे नोंद असलेले उमेदवार आहेत, तर हळदोणा, मये आणि मडकई या ३ मतदारसंघांमध्ये एकाही उमेदवाराच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला नाही. निवडणुकीत उतरलेल्या ‘जय महाभारत’ या पक्षाचा गुन्हा नोंद असलेला एकही उमेदवार नाही.
उमेदवारांच्या विरोधात विविध स्वरूपांचे गुन्हे प्रविष्ट
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे, विनयभंग करणे, महिलेवर अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, भ्रष्टाचार करणे, चोरी करणे, धमकी देणे, पोलीस ठाण्यावर आक्रमण करणे, मारहाण करणे, फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान करणे, रस्त्यावरील वाहतूक अडवणे, दुसर्याचा जीव धोक्यात घालणे, अनधिकृतपणे जमाव जमवणे, जुगार खेळणे, रेल्वे वाहतूक अडवणे, धनादेश न वटणे, अनधिकृतपणे आंदोलन करणे, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये उमेदवारांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट झालेले आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात खटलेही चालू आहेत.
दोन उमेदवारांना पोलीस कोठडीची शिक्षा
दोन उमेदवारांना पोलीस कोठडीही ठोठावण्यात आलेली आहे. यातील एका उमेदवाराला मारहाण केल्याच्या प्रकरणी ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दुसर्या उमेदवाराला धनादेश न वटवल्याच्या प्रकरणी ३ मासांची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.