५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोलशेत, ठाणे येथील चि. रूहीन अभ्युदय कस्तुरे (वय ५ वर्षे) !

चि. रूहीन अभ्युदय कस्तुरे

१. जन्मापूर्वी

सौ. गौरी कस्तुरे

अ. ‘चि. रूहीनच्या आईला (सौ. गौरी कस्तुरे हिला) गर्भारपणात कुठलाच त्रास झाला नाही. तिला केवळ घरचेच जेवण, म्हणजे वरण-भात, तूप आणि उपवासाचे पदार्थ खाण्याचे डोहाळे लागले होते. बाहेरचे काहीही खाल्ले, तर तिला उलट्या आणि जुलाब होऊन पुष्कळ त्रास होत असे.

आ. गौरी नियमित रामरक्षा स्तोत्र म्हणत असे आणि दत्ताचा नामजप, ध्यान-धारणा आणि योगासने करत असे. हे सर्व करतांना ‘गर्भाला ते पुष्कळ आवडत आहे आणि ते आनंदात आहे’, असे तिला जाणवत असे. रामरक्षा स्तोत्र म्हणत असतांना ‘गर्भ शांतपणे ऐकत आहे’, असे गौरीला वाटत असे.

२. जन्म ते २ वर्षे

अ. चि. रूहीनचा लहानपणापासून आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही. ती पुष्कळ शांत असल्याने ‘घरात लहान बाळ आहे’, असे कोणालाही जाणवत नसे. तिला ताप किंवा बरे नसले, तरी ती शांत रहात असे. ती कधीही रडली नाही.

आ. चि. रूहीन पांढर्‍या रंगाचे पदार्थच खात असे, उदा. केवळ पांढरा भात, दही, दहीभात, केळे, साबुदाणा खिचडी इत्यादी.

३. वय २ ते ४ वर्षे

सौ. मुक्ता देशपांडे

३ अ. नामजप आणि स्तोत्र यांची आवड असणे

१. चि. रूहीन नामजप करते, तसेच रामरक्षेतील बरेच श्लोक आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा ‘ॐ आनंदम् हिमालयम्…..’ हा मंत्रजप अतिशय आवडीने म्हणते. तिला कुंजिकास्तोत्र आणि श्री बगलामुखी स्तोत्र नियमित ऐकायला आवडते.

२. तिला पूजा आणि आरती करणे आवडते. ती आरतीच्या वेळी टाळ सुरेख वाजवते.

३. तिला देवळात जायला पुष्कळ आवडते.

४. चि. रूहीन अंघोळ झाल्यानंतर आणि शाळेत जातांना देवासमोर हात जोडून जयघोष करते.

५. ती खेळतांना ‘दिगंबरा दिगंबरा…’ हा नामजप छान चालीत म्हणत असते.

३ आ. संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

१. चि. रूहीन बाहेर खेळायला गेली की, फुले गोळा करून आणते आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला अन् देवाला वाहते.

२. तिच्या ‘पिगी बँके’त तिने साठवलेले पैसे आम्ही मोजत असतांना तिने त्यातील एक नाणे घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ ठेवले आणि ‘हे माझे अर्पण आहे’, असे त्यांना म्हणाली.

३. नामजपाच्या वेळी चि. रूहीन ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन मन लावून पहात असते.

४. एकदा चि. रूहीन दैनिक ‘सनातन प्रभात’मधील संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे छायाचित्र पाहून आनंदाने म्हणाली, ‘‘आज त्यांचा वाढदिवस आहे, तर मी आता बाबांसाठी भेटकार्ड बनवते.’’ ती अनेकदा प.पू. बाबा आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यासाठी भेटकार्डे बनवत असते.

३ इ. सेवेची आवड असणे

१. चि. रूहीन माझ्यासह नियतकालिकांच्या वितरणाच्या सेवेला येते. सेवेसाठी कितीही चालायचे असले, तरीही ती न थकता माझ्या समवेत चालते.

२. ती मला अर्पणाचे पैसे मोजण्यासाठी साहाय्य करते.

३ ई. इतर गुण

१. चि. रूहीन पुष्कळ मनमोकळी आहे. ती प्रश्नांची उत्तरे धीटपणे आणि हुशारीने देते. तिची निरीक्षणक्षमता पुष्कळ दांडगी आहे.

२. तिच्यामध्ये ‘चित्र काढणे आणि रंगवणे, नृत्य करणे, रांगोळी काढणे’, असे पुष्कळ कलागुण आहेत. ती शाळेत कविता, गाणे, नाचणे यांमध्ये नेहमी बक्षिसे मिळवते. ती घंटोन्घंटे शांतपणे चित्र रंगवत असते.

३. तिची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे. तिला श्लोक, गाणी आणि नामजप लगेच पाठ होतात.

४. चि. रूहीनमधील स्वभावदोष : हट्टीपणा, आग्रही (माझेच ऐकावे) असणे, खाण्यामध्ये पुष्कळ आवड-नावड, कार्टून पहाण्यासाठी भ्रमणभाष हवा असणे.

‘परात्पर गुरुमाऊली, तुम्हीच चि. रूहीनचे गुण दाखवून ते माझ्याकडून लिहून घेतलेत’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आमच्याकडून चि. रूहीनवर आपल्याला अपेक्षित असे संस्कार करवून घ्या’, हीच आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. मुक्ता देशपांडे (आजी, आईची आई), कोलशेत, ठाणे. (५.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक