४२६ पानांचे दोषारोपपत्र, ६४ सुनावणी, २९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले !

  • हिंगणघाट (वर्धा) जळीतकांड प्रकरण

  • ९ फेब्रुवारीला निकाल घोषित होणार !

आरोपी विकेश नगराळे

वर्धा – जिल्ह्यातील हिंगणघाट येथील मृत अंकिता यांच्या जळीतकांड प्रकरणाचा निकाल ९ फेब्रुवारी या दिवशी लागणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजाच्या केवळ १९ दिवसांतच ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाट येथील प्रथम श्रेणी न्यायालयात प्रविष्ट केले होते. न्यायालयातही या प्रकरणात एकूण ६४ सुनावणी घेत २९ साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत. या घटनेला २ वर्षे झाली आहेत. (संबंधित अधिकार्‍यांनी मनावर घेतल्यास प्रकरणांचा निपटारा होऊ शकतो, हे या उदाहरणातून सिद्ध होते. हा आदर्श समोर ठेवून प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, हीच जनतेची अपेक्षा ! – संपादक)

मृत अंकिता या हिंगणघाट येथील दिवंगत आशा कुणावार महिला महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांना ३ फेब्रुवारी २०२० या दिवशी सकाळी हिंगणघाट येथील नंदोरी चौकात आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल ओतून पेटवून दिले. यात अंकिता गंभीर घायाळ झाल्या आणि १ आठवडा मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १० फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस उपअधीक्षक तृप्ती जाधव यांनी दोषारोपपत्र पूर्ण केले. सरकारने पीडितेची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. प्रकरणाची पहिली सुनावणी ४ मार्च २०२० या दिवशी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात झाली.