सरकारने किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्री करण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा, या मागणीसाठी सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची जनजागृती फेरी !
वाईन विक्रीचा निर्णय रहित करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक
सांगली, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – सरकारने किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्री करण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत ६ फेब्रुवारीला जनजागृती फेरी काढण्यात आली. फेरीचा प्रारंभ मारुति चौक येथील शिवतीर्थापासून करण्यात आला. हरभट रस्ता, राजवाडा चौक, बदाम चौक, पंचमुखी मारुति मंदिर या मार्गे शिवतीर्थावर फेरीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी ‘संपूर्ण दारूबंदी झालीच पाहिजे’, यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. फेरीत धारकर्यांसह विविध संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या फेरीत महिलांची संख्या लक्षणीय होती. फेरीत गोरक्षणाच्या संदर्भात कार्य करणार्या संघटना आणि त्यांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ! – मिलिंद तानवडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार आज दुकानात वाईन विकत असून उद्या महाराष्ट्रालाच वाईनचे दुकान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आज अनेक महिलांचे संसार त्यांचे पती मद्यपान करत असल्याने उद्ध्वस्त होत आहेत. उद्या लहान मुले जर मद्यपान करू लागली, तर किती विदारक परिस्थिती निर्माण होईल ? त्यामुळे या निर्णयाला आपण सगळ्यांना विरोध करणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. मिलिंद तानवडे यांनी फेरीच्या समारोपप्रसंगी केले.