‘अल्पाहार सिद्ध करण्याच्या सेवेत देवच समवेत आहे’, असा भाव ठेवून कृती केल्यामुळे देवाचे साहाय्य मिळाल्याविषयी सौ. स्मिता नाणोसकर यांना आलेली अनुभूती
१. अल्पाहाराची सेवा करण्याच्या आदल्या दिवशी पुष्कळ त्रास होणे आणि पू. गडकरीकाकांनी एका साधकाचे साहाय्य घेण्याचे सुचवणे
‘१८.४.२०२० या दिवशी माझ्याकडे सकाळचा अल्पाहार सिद्ध करण्याची सेवा होती. आदल्या दिवशी मला पुष्कळ शारीरिक त्रास होत होता. माझे डोके दुखून हात-पाय गळून गेल्यासारखे झाले होते. रात्रीचे १०.३० वाजले होते. त्या वेळी ‘उद्याची अल्पाहाराची सेवा मी कशी करू शकणार ?’, असा विचार माझ्या मनात आला. याविषयी मी पू. गडकरीकाका यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला एका साधकाचे नाव सुचवून ‘त्याचे साहाय्य घेऊ शकता’, असे सांगितले; परंतु ‘एवढ्या उशिरा मी त्या साधकाला निरोप कसा काय देणार ?’, असा विचार माझ्या मनात आला.
२. साधकाला संपर्क न करताही सेवा करतांना अकस्मात् तो साधक येऊन त्याने काही वेळ साहाय्य करणे
दुसर्या दिवशी सकाळी प्रार्थना करून मी सेवेला आरंभ केला. तेवढ्यात तो साधक स्वयंपाकघरात आला. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही मला थोडे साहाय्य करू शकता का ?’’ तेव्हा ते लगेचच सिद्ध झाले. त्या वेळी माझ्याकडून परात्पर गुरुदेव आणि श्री अन्नपूर्णादेवी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. त्याच दिवशी सेवा पूर्ण झाल्यावर श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडल्याची अनुभूतीही आली. देवानेच मला त्याची प्रचिती दिली असल्याचे मला जाणवले. तोपर्यंत निम्म्या पोह्यांचा प्रसाद (एक घाणा) बनवून तयार झाला होता. साहाय्यासाठी आलेला साधक सेवा झाल्यावर निघून गेला.
३. उरलेली सेवा करतांना समवेत दुर्गादेवी असून तीच सेवा करत असल्याचे जाणवणे आणि सेवा झाल्यानंतर कुठलाही त्रास न होणे
त्यानंतर उरलेले पोहे बनवण्यापूर्वी मी देवाला प्रार्थना करत होते. तेव्हा ‘मी एकटी नसून माझ्या समवेत श्री दुर्गादेवी आहे’, असे मला जाणवले आणि तीच ही सेवा माझ्या माध्यमातून करवून घेत असल्याची मी अनुभूती घेतली. त्या वेळी पोहे ढवळणारे हात माझे नसून प्रत्यक्ष श्री दुर्गादेवीच ते ढवळत असल्याचे मला जाणवले. अन्य वेळी अल्पाहाराची सेवा झाल्यानंतर मला पुष्कळ त्रास होतो; परंतु त्या दिवशी मला कुठलाही त्रास झाला नाही.
परात्पर गुरुदेवांनीच ही सेवा माझ्याकडून करवून घेतल्यामुळे मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
– सौ. स्मिता नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.४.२०२०)