कठोर आणि नियमितपणे साधना करणारे नागपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजेश्वर विश्वनाथ जोशी (वय ८९ वर्षे) !
१. नियमितपणा आणि सातत्य
‘माझे वडील श्री. राजेश्वर विश्वनाथ जोशी सकाळी लवकर उठतात आणि स्नान, संध्या, देवपूजा आणि स्तोत्रपठण करतात. संध्याकाळी पुन्हा संध्या करतात आणि जप अन् पठण करतात. ते प्रतिदिन सकाळी मंदिरात जातात. त्यांचा हा दिनक्रम नियमितपणे वयाच्या ८६ व्या वर्षीही (आताचे वय ८९ वर्षे) चालू आहे.
२. वक्तशीरपणा
बाबांचा वक्तशीरपणा अत्यंत वाखाणण्यासारखा आहे. ते सरकारी चाकरी करत होते, तरी वेळेवर कामावर जाणे आणि येणे, हा पायंडा त्यांनी शेवटपर्यंत पाळला.
३. दत्त संप्रदायानुसार केलेली साधना
अ. बाबा श्री दत्त संप्रदायानुसार साधना करतात. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी श्रीगुरुचरित्राचे पारायण चालू केले. ते वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत करत होते. आता त्यांना डोळ्यांनी अल्प दिसते; म्हणून त्यांनी पारायण बंद केले आहे.
आ. त्यांनी नर्मदा परिक्रमा एकदा पूर्ण केली आहे. त्यांनी श्री दत्तात्रेयाच्या सर्व स्थानी जाऊन साधना केली आहे. बाबांची श्रद्धास्थाने प.पू. नृसिंह सरस्वती (कारंजा) आणि प.पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) आहेत.
इ. ते अमरकंटक येथे सातत्याने जातात. त्यांनी नर्मदेच्या काठी राहून साधना करतांना तेथील थंडी, वारा आणि पाऊस सहन करून साधना केली आहे.
ई. बाबा धार्मिक क्षेत्रे, देवळे इत्यादी ठिकाणी सढळ हस्ते दानधर्म करतात.
४. आई गेल्यावर चार मुलींना चांगले वळण लावणे
त्यांनी पत्नीवियोगानंतर आम्हा चारही मुलींना धार्मिक वळण लावतांना नित्यनेमाने आमच्याकडून देवळात जाणे, स्तोत्रपठण करणे, शुभंकरोती आणि रामरक्षा म्हणणे, हे सर्व करवून घेतले. ‘आम्ही कपाळावर कुंकू लावतो का ? हातात बांगड्या घालतो का ?’, याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे आणि आमच्या सर्व गोष्टींवर त्यांचा कटाक्ष असायचा.
५. वडिलांच्या अस्तित्वामुळे चैतन्य आणि आनंद जाणवणे
बाबा चार वर्षांपासून माझ्याकडे आहेत. ते ज्या आसंदीवर किंवा गादीवर बसतात तेथे चैतन्य जाणवते. त्यामुळे माझा तेथे बसल्यावर एकाग्रतेने नामजप होतो. त्यांच्या जवळ बसल्यावरही माझा नामजप आपोआप चालू होतो. त्यामुळे संपूर्ण घरात चैतन्य जाणवते. त्यांची सेवा करतांना मला पुष्कळ आनंद अन् चैतन्य मिळते.’
– सौ. वृषाली तळवलकर (श्री. राजेश्वर विश्वनाथ जोशी यांची कन्या), नागपूर. (२०.९.२०१८)