इंग्रजीप्रमाणे ८ (8) च्या आकारात चालणे हा उत्तम व्यायामप्रकार !
‘सध्या अनेक ठिकाणी सकाळी बाहेर चालायला जाण्यास अडचणी आहेत. विशेषतः ‘वयस्कर व्यक्तींनी बाहेर जाऊ नये’, असे घरातील सदस्यांना वाटते. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत जेव्हा बाहेर जाणे कठीण असते, तेव्हा अल्प जागेत सहज करता येण्याजोगा व्यायामप्रकार म्हणजे इंग्रजी ८ (8) च्या आकारात चालणे !
१. चमत्कारिक लाभ देणारी पद्धत !
‘चालण्याच्या व्यायामांपैकी इंग्रजी ८ (8) च्या आकारात चालणे’, ही चमत्कारिक लाभ देणारी उत्तम पद्धत आहे. या पद्धतीनुसार आपण प्रतिदिन १५ ते ३० मिनिटे चालू शकतो. दुचाकी चालवण्यासाठी वाहन अनुज्ञप्ती काढतांना इंग्रजी ८ (8) या अंकाच्या आकारात वाहन चालवण्यास सांगण्यात येते. ८ आकाराच्या रेषेत चालल्यास आरोग्य चांगले राखता येते. अलीकडे काही उद्यानांमध्ये या आकाराचे ‘वॉक फुटेज’ (चालण्याचा मार्ग) उपलब्ध आहेत.
२. संबंधित ठिकाणी ८ चा आकडा रंगवून घ्या !
सकाळी किंवा संध्याकाळी रिकाम्या पोटी, कुठल्याही मोकळ्या जागी हा व्यायाम करू शकतो. खोली मोठी असेल, तर खोलीत, मार्गिकेत, आगाशीत किंवा निवासी संकुलाच्या वाहनतळात ८ चा आकडा रंगवून घेऊ शकतो. आरंभी खडूने तो आकडा काढावा.
३. ८ आकड्यावरून चालण्याचा व्यायाम कशा प्रकारे करावा ?
दक्षिण दिशेला उभे राहून तोंड उत्तर दिशेकडे करावे. घड्याळाच्या दिशेने आरंभ करून ८ च्या आकड्यानुसार चालून परत मूळ जागी यायचे. असे ५ मिनिटे चालायचे. नंतर उलट्या दिशेने म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ५ मिनिटे चालायचे. अशी ३ आवर्तने केली की, ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम पूर्ण होतो. उपलब्ध वेळेनुसार आवर्तने अल्प-अधिक करू शकतो. काही जण एकाच वेळी १५ मिनिटे एका दिशेने आणि नंतर १५ मिनिटे दुसर्या दिशेने असाही व्यायाम करतात. या वेळी ‘ॐ’ चा जप किंवा गुरुमंत्र यांचा जप केल्यास अधिक चांगले !
४. प्राचीन नाडीपट्ट्यांत ८ आकड्याच्या व्यायामप्रकाराचे मूळ असणे हे वैशिष्ट्यपूर्ण !
‘इन्फिनिटी वॉकिंग’ असेही एक नाव या ८ च्या आकारात चालण्याच्या पद्धतीला दिले जाते. या व्यायामप्रकाराचे मूळ प्राचीन नाडीपट्ट्यांत (भूर्जपत्रावर लिहिलेल्या) आहे. तमिळ सिद्ध पुरुषांनी सहस्रो वर्षांपूर्वी या विषयावर विस्ताराने लिहून ठेवले आहे. आधुनिक काळात वर्ष १९८० च्या सुमारास उपचारात्मक मानसशास्त्रज्ञ देबोराह सनबेक यांनी या विषयावर एक ग्रंथ प्रसिद्ध केला होता. विदेशांत अनेक रोगांवर उपचारांसाठी या चालण्याच्या पद्धतीचा वापर केला जातो.
५. ८ च्या आकारात चालण्याचे लाभ
अ. जेव्हा आपण दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे चालण्याचा सराव करतो, तेव्हा पृथ्वीच्या नैसर्गिक चुंबकीय क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने जात असतो. त्यामुळे आपल्या शरिरातील षट्चक्रे, तसेच इंद्रियेही कार्यान्वित होतात.
आ. शरिरातील प्रत्येक अवयव, उदा. घोटे, गुडघे, पोट, मान, खांदे यांची हालचाल होते. या प्रकारच्या चालण्यात नेहमीच्या चालण्यापेक्षा शरिरातील सर्व अवयवांचा अधिक व्यायाम होतो.
इ. जेव्हा आपण पादत्राणे न घालता भूमीवर अनवाणी चालतो, तेव्हा बिंदूदाबन पद्धतीनुसार तळपायांवरील सर्व संवेदना बिंदू जागृत होतात. काही आठवड्यांच्या नियमित सरावानंतर जुनाट आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.
ई. सामान्यदृष्ट्या चालतांना मित्रांशी किंवा भ्रमणभाषवर बोलणे होते; पण ८ आकड्यावर चालल्याने बोलणे होण्याची शक्यता टाळली जाते.
उ. नियमितपणे सराव केल्यास थायरॉईड, अपचन, लठ्ठपणा, गुडघेदुखी, बद्धकोष्ठता, संधीवात आदी विकारांवर चांगला लाभ होतो.
ऊ. अशा चालण्यामुळे रक्तदाब नियमित होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण न्यून होऊन मधुमेहासारख्या रोगापासूनही काही प्रमाणात आराम मिळतो.
ए. मनावरील सर्व प्रकारचा ताण दूर होऊन मन शांत होण्यास साहाय्य होते. दिवसभर उत्साह टिकून रहातो.
ऐ. ८ आकारात चालण्याच्या एकाग्रतेमुळे डोळ्यांशी संबंधित समस्या सुटण्यास साहाय्य होते.
ओ. पारंपरिक चालण्याच्या व्यायामापेक्षा मर्यादित जागेमध्ये अशा प्रकारच्या चालण्याचे अनेक लाभ आहेत. विशेषतः वयस्करांसाठी हा व्यायामप्रकार पुष्कळ लाभदायक आहे.
‘वरील सर्व सूत्रे वाचल्यावर ती सोडून न देता त्याप्रमाणे कृती करून आपल्या जीवनात पालट घडवून आणूया’, अशी गुरुचरणी प्रार्थना!’
– श्री. श्रीराम काणे, देहली (२४.११.२०२१)