‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा !
हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन हिंदु जनगजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना ४ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वीकारले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. शशी बिडकर, श्री. किशोर घाटगे, हिंदू एकताचे श्री. चंद्रकांत बराले आणि श्री. नंदकुमार अहिर उपस्थित होते.
मलकापूर येथे महाविद्यालयात निवेदन
मलकापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मलकापूर येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स’च्या मुख्याध्यापिका के.आर्. कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी ‘आम्ही विद्यार्थिनींचे प्रबोधन करू’, असे सांगितले. ‘मलकापूर हायस्कूल मलकापूर आणि ज्युनिअर कॉलेज’चे प्राचार्य श्री. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी तेथील शिक्षक आणि शिक्षिका यांना एकत्र करून विषय सांगितला, तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करू, असा मानस या वेळी व्यक्त केला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी आणि श्री. सुधाकर मिरजकर, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. दिलीप कुंभार आणि श्री. वैभव बोटांगळे उपस्थित होते.