पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ६ घंटे साक्ष
कोरेगाव भीमा हिंसाचाराचे प्रकरण
पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ४ फेब्रुवारी या दिवशी चौकशी आयोगासमोर ६ घंटे साक्ष नोंदवण्यात आली. या वेळी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. या चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला; मात्र सरकारी अधिवक्ता शिशीर हिरे यांनी या चौकशीविषयी माहिती देतांना रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले. शुक्ला यांच्या साक्षीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पुढील कामकाज मुंबई येथे २१ ते २५ फेब्रुवारी या काळात होणार आहे.
शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ ला एल्गार परिषद घेण्यात आली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी, म्हणजे १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. कोरेगाव भीमा हिंसाचाराचे पडसाद पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते.
एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडून काही पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्ला यांची साक्ष महत्त्वाची आहे. ‘त्यांची साक्ष आयोगासमोर व्हावी’, असा अर्ज आयोगाचे अधिवक्ता आशिष सातपुते यांनी आयोगाकडे सादर केला होता. कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला, त्या वेळी विश्वास नांगरे-पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते. त्यामुळे त्यांचीही साक्ष घेतली जाणार आहे, तसेच नांगरे पाटील यांना पुराव्याचे प्रतिज्ञापत्र देण्याचा आदेश देण्यात आला आहे.