श्री तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थ कुंडाच्या बाजूचे स्वछतागृह हटवा ! – हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
धाराशिव, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थ कुंडाच्या बाजूला मंदिर संस्थानने काही वर्षांपूर्वी स्वच्छतागृह बांधले होते. गोमुख तीर्थ कुंड हे पवित्र गंगेचा स्रोत म्हणून प्रचलित आहे, तसेच मंदिरात येणारे भाविक या कुंडातील पवित्र जलाने स्वतःचे शुद्धीकरण करून घेतात, तसेच हे पवित्र जल प्राशन करतात. गोमुख तीर्थ कुंडाचे धार्मिक विधीसाठी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थ कुंडाच्या बाजूचे स्वछतागृह हटवावे, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना २ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (महसूल) श्रीमती मैंदर्गी यांनी हे निवेदन स्वीकारले. (एका शक्तीपिठाच्या ठिकाणी पवित्र गोमुख तीर्थाच्या कुंडाच्या शेजारी स्वच्छतागृह बांधून मंदिर समिती त्याचे पावित्र्य भंग केले आहे. त्यामुळे मंदिर समितीने हे स्वच्छतागृह तेथून तात्काळ हटवणे आवश्यक आहे ! यासाठी तीर्थक्षेत्रे भक्तांच्याच कह्यात हवीत. – संपादक)
(सौजन्य : Dr. BVC)
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंडाच्या मार्गावर असलेल्या स्वच्छतागृहामुळे येथे दुर्गंधी पसरत आहे आणि कुंडाची विटंबना होत असल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या खटला क्रमांक १७४३ च्या १९८६ च्या निकालानुसार कोणत्याही मंदिर, तसेच धार्मिक स्थळाच्या आवारात स्वच्छतागृह अथवा कचरा निर्मूलन केंद्र नसावे, असा आदेश आहे. त्यामुळे पवित्र गोमुख तीर्थ कुंडाच्या लगत बांधण्यात आलेल्या या स्वच्छतागृहामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत आहे. तरी भाविकांची श्रद्धा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून ते स्वच्छतागृह तात्काळ बंद करावे. यावर परीक्षित साळुंके, दीपक पलंगे, सुदर्शन वाघमारे, दिनेश कापसे, ओंकार पवार, दिनेश धनके आदींच्या स्वाक्षर्या आहेत.