पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (वय ९० वर्षे) यांनी त्यांचे चुलत आजोबा स्वरलिपीकार पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या गायनाची सांगितलेली वैशिष्ट्ये

साधना म्हणून ‘संगीत’ जगणारे काही आदर्श संगीत कलाकार !

कु. तेजल पात्रीकर

‘गायन, वादन आणि नृत्य या ईश्वरप्राप्तीसाठी देवाने निर्मिलेल्या प्राचीन कला आहेत. कलेच्या माध्यमातून साधना करणारे स्वामी हरिदास, त्यांचे शिष्य तानसेन, पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, असे अनेक ऋषितुल्य कलाकार आजपावेतो होऊन गेले आणि त्यांच्यासारखेच अनेक चांगले कलाकार आजही समाजात आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर यांच्या समवेत साधकांनी वर्ष २०१९ मध्ये अशा अनेक कलाकारांच्या भेटी घेतल्या.

गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांच्या भेटींतून ‘त्यांनी कठीण परिस्थितीत केलेला संगीत साधनेचा प्रवास, त्यांची संगीत साधना करण्याची तळमळ, प्रसिद्धीकडे न धावता साधना म्हणून अंगिकारलेले जीवन आणि या कलाकारांना संगीत साधना करत असतांना आलेल्या विविध अनुभूती’, यांविषयी माहिती मिळाली, तसेच त्यांचे संगीत साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शनही लाभले.

‘संगीत क्षेत्रातील सर्वांना संगीत साधनेसाठी या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा आणि त्यांनीसुद्धा संगीतकला ‘साधना’ म्हणून अंगिकारावी’, यांसाठी गायन, वादन अन् नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांची घेतलेली मुलाखत लेखमालेच्या स्वरूपात येथे प्रसिद्ध करत आहोत. ‘यातून सर्वच कलाकारांना साधनेसाठी प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

(भाग ३)

साधना म्हणून संगीत जगणार्‍या पं. पलुस्कर कुटुंबियांचा थोडक्यात परिचय

पं. गोविंदराव पलुस्कर

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर म्हणजे संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व ! पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर हे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे नातू आहेत. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर हे श्री. चिंतामणराव पलुस्कर यांचे काका आहेत. पं. गोविंदरावांचे वडील श्री. चिंतामणराव हे लहानपणापासून त्यांचे चुलत भाऊ पं. दत्तात्रेय विष्णु पलुस्कर यांच्याकडे रहायचे. ते पं. दत्तात्रेय पलुस्कर यांच्याकडेच संगीत शिकले आहेत. पं. गोविंदराव यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांचे वडील श्री. चिंतामणराव पलुस्कर हेच त्यांचे संगीतातील गुरु आहेत. वडिलांप्रमाणेच पं. गोविंदराव यांनीही सगळे जीवन संगीतासाठी समर्पित केले आहे.

पं. गोविंदराव पलुस्कर यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली असूनही त्यांच्यात तरुणांना लाजवेल, असा उत्साह आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने संगीत समन्वयक सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर यांनी त्यांची भेट घेतली. या लेखाच्या पहिल्या भागात आपण ‘या भेटीच्या वेळी पं. पलुस्कर यांच्याविषयी सांगितलेली कुटुंबीय अन् त्यांचे शिष्य यांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये’ पाहिली. आता या भागात आपण पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर यांनी त्यांचे चुलत आजोबा स्वरलिपीकार पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या गायनाची सांगितलेली वैशिष्ट्ये पहाणार आहोत.

१. स्वरलिपीकार पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर

१ अ. स्वरलिपीकार पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांची गुणवैशिष्ट्ये

१ अ १. पत्नीची चूक तिला न दुखावता शांतपणे सांगणे : ‘पं. विष्णु दिगंबर पलुस्कर राजघराण्यात रहात होते. त्यांच्यासाठी एक वेगळा स्वयंपाकी असायचा. त्यांच्या मागणीनुसार तो लगेच ते पदार्थ आणून द्यायचा. पं. पलुस्कर यांच्या पत्नी त्यांना प्रतिदिन सकाळी चांदीच्या भांड्यात दूध आणून द्यायच्या. एकदा त्यांना दूध आणून द्यायला उशीर झाला. तेव्हा पं. पलुस्कर त्यांच्या पत्नीला म्हणाले, ‘‘मी तुम्हाला पुष्कळ त्रास देतो ना ? आता मी दूध पिणार नाही.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांच्या पत्नी त्यांना म्हणाल्या, ‘‘माझी चूक झाली. उद्यापासून असे होणार नाही.’’ अशा प्रकारे त्यांनी तो प्रसंग शांतपणे हाताळला.

१ अ २. सलग १८ घंटे संगीताचा सराव करणे : पं. विष्णु पलुस्कर सलग १८ घंटे संगीताचा सराव करायचे. यातून त्यांची संगीताविषयीची चिकाटी, तळमळ आणि कष्ट करण्याची वृत्ती दिसून येते. त्यांनी संगीताच्या सरावासाठी आणि साधनेसाठी मोठा त्याग केला आहे.

१ अ ३. सलग ७ दिवस केवळ डाळिंबाचा रस घेऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करणे : पं. विष्णु पलुस्कर हे महान दत्तभक्त होते. ते सलग ७ दिवस श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी एका खोलीत एकटे बसायचे. ते अंधारात समई लावून श्री गुरुचरित्र वाचायचे. त्या खोलीत कुणालाही जायची अनुमती नसायची. त्या कालावधीत ते कुणाशीही बोलत नसत. ते केवळ डाळिंबाच्या रसावर ७ दिवस काढायचे. ते अन्य काहीही खायचे नसत. अशा प्रकारे त्यांची ७ दिवस साधना चालू असायची.

१ आ. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या गायनाचे वैशिष्ट्य

१ आ १. पं. विष्णु पलुस्कर यांचा ‘तार षड्ज’ (वरचा ‘सा’) लागल्यावर संपूर्ण सभागृह हालत असल्याचे भासणे : पूर्वीच्या काळी ध्वनीवर्धक यंत्रणा (माईक सिस्टिम) नव्हती, तरीही त्या काळच्या गायकांचे आवाज खणखणीत असल्याने त्यांचे गायन शेवटपर्यंत सर्वांना ऐकू जायचे. पं. विष्णु पलुस्कर गात असतांना संपूर्ण सभागृह दुमदुमून जात असे. त्यांचा ‘तार षड्ज’ (वरचा ‘सा’) लागला की, संपूर्ण सभागृह हालत असल्याचे भासायचे. इतकी त्यांच्या संगीतात क्षमता होती.

१ इ. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी संगीताच्या माध्यमातून केलेले भगवद्भक्तीचे प्रचारकार्य

१ इ १. गिरनार पर्वतावर दत्तगुरूंनी एका साधूच्या रूपात पं. पलुस्कर यांना त्यांच्या अहंची जाणीव करून देणे आणि त्यांना भक्तीपरायण संगीताविषयी मार्गदर्शन करून भारतभर संगीतासह भक्तीचाही प्रसार करण्यास सांगणे : पं. विष्णु पलुस्कर हे गुजरात येथील गिरनार पर्वतावर गेले असता तेथे त्यांना गाण्याची इच्छा झाली. त्यांची शिष्यमंडळी थोडी पुढे निघून गेली होती. गात-गात त्यांचे डोळे बंद झाले. त्यांना कुणाची तरी चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले. त्यांच्यासमोर एक व्यक्ती उभी होती. ती त्यांचे गाणे ऐकत होती. त्या व्यक्तीला बघून पंडितजींना थोडा राग आला. ते उभ्या असणार्‍या व्यक्तीला उद्देशून म्हणाले, ‘‘काय रे ? तुला गाण्यातले काही कळते का ?’’ यावर ती व्यक्ती काहीच बोलली नाही. ती व्यक्ती म्हणजे एक साधू होते. ते साधू तेथून खाली निघून गेले. हे बघताच पंडितजी परत गायला लागले. थोड्या वेळाने त्यांना खालच्या दिशेने कुणीतरी गात असल्याचा आवाज आला. पंडितजी त्या आवाजाच्या दिशेने पर्वत उतरू लागले आणि त्या साधूसमोर येऊन उभे राहिले. तो आवाज अतिशय दैवी होता. साधू डोळे मिटून गात होते. त्यांना चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले. साधू डोळे उघडून स्मित करत म्हणाले, ‘‘तुम्ही अहंकारापासून दूर रहा; अन्यथा तुमचे गाणे पुष्कळ चांगले आहे. तुम्ही भारतभर फिरा. लाहोरपर्यंत जा. सगळीकडे संगीताचा प्रचार करा. संगीताच्या समवेत भक्तीचाही प्रचार करा. भारतभर फिरत तुम्ही मुंबईला पोचाल, तेव्हा मी तुम्हाला भेटीन.’’ अशा प्रकारे साक्षात् दत्तगुरूंनीच या ठिकाणी साधूच्या रूपात येऊन पं. विष्णु पलुस्कर यांना अहंकाराची जाणीव करून दिली आणि त्यांना भक्तीपरायण संगीताविषयी मार्गदर्शन केले. तेव्हापासून पं. विष्णु पलुस्कर यांनी ‘भक्ती’ हा संगीताचा अविभाज्य भाग मानला. (क्रमशः पुढच्या रविवारी)

– पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), नाशिक

संकलक : सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (वर्ष २०१९)