किल्ले भुदरगडावरील पश्चिम तटबंदीच्या संरक्षक चिलखती माचीने घेतला मोकळा श्वास !
‘मावळा प्रतिष्ठान’च्या प्रयत्नांना यश !
(माची : तटांनी सुरक्षित असलेली गडावरील सपाट जागा)
कोल्हापूर – किल्ले भुदरगडावरील पश्चिम दिशेला असणार्या तटबंदीला एक संरक्षक चिलखती माची आहे. मावळा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी ३ दिवस अथक परिश्रम घेऊन लुप्त झालेल्या माचीला मोकळा श्वास दिला. प्रजासत्ताकदिनानिमित्ताने मावळा प्रतिष्ठानने ३ दिवस मोहीम घेऊन ही कामगिरी केली. संरक्षक माची झाडे, वेली, काटेरी वनस्पती यांनी आच्छादली होती. ही चिलखती माची लोकांसमोर आणण्याचे काम मावळा प्रतिष्ठानकडून करण्यात आले. (जे एका स्वयंसेवी संस्थेला जमले ते पुरातत्त्व खाते का करू शकले नाही ? – संपादक)
१. माची खुली करण्यासाठी मावळ्यांना ३ वेगवेगळ्या मोहिमा घ्याव्या लागल्या. ‘सेफ्टी बेल्ट’च्या साहाय्याने दुहेरी तटबंदीवर उतरून बाहेरील बाजूने काही मावळे स्वच्छ करण्यासाठी उतरले आणि काही मावळ्यांनी संरक्षक माची स्वच्छ करण्याचे काम केले.
२. छत्रपती शिवरायांनी जिंकलेल्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या किल्ले भुदरगडावर अनेक वास्तू इतिहासातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. मावळा प्रतिष्ठान, तसेच अनेक संस्था हे जपण्यासाठी धडपडत आहेत.
३. या मोहिमेत मोहीमप्रमुख शशिकांत पाटील, श्री. कांतीभाई पटेल, श्री. सुरज शेटके आणि त्यांचे कार्यकर्ते, वैभव भारमल यांचे सहकार्य लाभले. भुदरगड वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रमुख श्री. किशोर अहिरे यांनी सदिच्छा भेट देऊन मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. ही मोहीम यशस्वी करण्यात कोल्हापूर, गारगोटी, भुदरगड, निपाणी, राधानगरी, कागल या भागांतील ५० मावळ्यांनी मोलाचे सहकार्य केले.