पुण्यात इमारतीचे बांधकाम चालू असतांना लोखंडी जाळी कोसळून ५ कामगारांचा मृत्यू !

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

पुणे – येथील येरवडा परिसरातील शास्त्रीनगरमध्ये ३ फेब्रुवारीला रात्री साडेदहा वाजता इमारतीच्या स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर ५ कामगार गंभीर घायाळ झाले आहेत, तसेच इमारतीच्या ढिगार्‍याखाली आणखी कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांना ढिगार्‍याखालून काढून प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक पोलीस आणि अग्नीशमनदलाच्या कर्मचार्‍यांकडून चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून कामगारांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.

राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्यात येणार आहे, तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दुर्घटना घडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना आवश्यक ती सुरक्षा साधने पुरवली गेली नव्हती, असे प्रथमदर्शनी आढळून आले आहे, तसेच रात्रीच्या वेळी काम चालू ठेवण्याविषयी अनुमती घेतली होती का ? याचीही विचारणा होत आहे.