महाराष्ट्रात विजेच्या धक्क्याने २ सहस्र ६५७ जणांचा मृत्यू !
५६७ जणांच्या मृत्यूला महावितरण उत्तरदायी !
शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत महावितरणने प्राधान्याने सुरक्षेचे उपाय योजणे आवश्यक ! – संपादक
नागपूर – राज्यात गेल्या ३२ मासांमध्ये विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचारी वगळून २ सहस्र ६५७ व्यक्ती आणि ३ सहस्र १२० प्राणी यांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी विद्युत् निरीक्षकाने केलेल्या चौकशीत ५६७ व्यक्तींसह (३८.६० टक्के), १ सहस्र ९२२ प्राण्यांच्या (९१.१३ टक्के) मृत्यूला महावितरण दोषी आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून समजली आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आणले आहे.
सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत असल्याचा दावा महावितरण करते; परंतु राज्यात वर्ष २०१९-२०२० या आर्थिक वर्षापासून ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीपर्यंत महावितरणची सेवा असलेल्या क्षेत्रात विजेच्या धक्क्याने वरील आकडेवारीनुसार व्यक्ती आणि प्राणी यांचा मृत्यू झाला आहे. दगावलेल्यांपैकी ८५८ व्यक्ती आणि १ सहस्र १८३ प्राणी हे विदर्भातील आहेत. महावितरणच्या या अपघातांपैकी १ सहस्र ४६९ व्यक्तींसह २ सहस्र १०९ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची विद्युत् निरीक्षकांकडून चौकशी झाली. त्यांच्या चौकशी अहवालानुसार १ सहस्र ४६९ व्यक्तींच्या (६१.४० टक्के) आणि १८७ प्राण्यांच्या (८.८७ टक्के) प्रकरणांत मात्र महावितरणची चूक नाही, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.