राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अल्प झाल्याने निर्बंध अल्प करू ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
कोरोनाबाधितांची संख्या मार्चअखेरीस पुष्कळ अल्प होणार !
जालना – शासनाचा कल हा निर्बंध अल्प करण्याकडे असून जे काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आता कोरोनाची रुग्णसंख्या अल्प होत आहे. मुंबई आणि पुणे येथेही संख्या अल्प होत आहे. काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असली, तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी निर्बंध अल्प करण्याकडे राज्यशासनाचा कल आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव आणि राज्यातील मृत्यूदर यांमध्ये घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने निर्बंधांमध्येही सवलत देण्यात आली आहे; मात्र कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार ? याविषयी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सध्या राज्यात राज्यशासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने अल्प होत आहेत. दर आठवड्याला लावलेले निर्बंध अल्प होत असल्याचे दिसून येत आहे. मार्चच्या मध्यापर्यंत आपण तिसर्या लाटेच्या शेवटाकडे जाऊ, असे तज्ञांच्या मतावरून आपल्याला वाटत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मार्चअखेरीस पुष्कळ अल्प होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.