‘स्वच्छ सातारा, सुंदर सातारा’ प्रत्यक्षात व्हावे !

संपूर्ण भारतामध्ये करण्यात आलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’मध्ये कराड नगरपालिकेने (जिल्हा सातारा) प्रथम क्रमांक पटकावला आहे. सातारा शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असणार्‍या कराड नगरपालिकेने ‘स्वच्छ कराड, सुंदर कराड’ ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता वास्तवात उतरवली; मात्र ‘सातारा नगरपालिकेने केवळ घंटागाड्यांवरील गाण्याच्या माध्यमातूनच सातारा स्वच्छ करण्याचा प्रयत्न चालवला आहे कि काय ?’, अशी शंका निर्माण होते. स्वच्छ कराडसाठी आग्रही असलेल्या कराड नगरपालिकेने पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर घाण केल्यास मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकाची नेमणूकही केली आहे. केवळ श्वानच नव्हे, तर घोडे, गाढव, म्हैस या प्राण्यांनी जरी रस्त्यावर घाण केली, तरी संबंधित मालकाला ५०० रुपयांचा दंड होणार आहे. ‘असाच निर्णय सातारा नगरपालिकेनेही घ्यावा’, अशी सातारावासियांची अपेक्षा आहे.

सातारा शहरातील राजवाडा आणि भाजी मंडई परिसरामध्ये काही मुक्त जनावरे फिरत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ती जनावरे रस्त्यामध्ये घाणही करतात. मोकाट श्वान मोठ्या प्रमाणात फिरत असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. अनेक वेळा पालिकेला लेखी निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नगरपालिका मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचे काम हातात घेणार होती; मात्र ते अजूनही चालू झालेले नाही. पाळीव म्हशी खंडोबाचा माळ येथे चरण्यासाठी नेल्या जातात; मात्र सायंकाळी त्या राजपथावरून घाण करत परततात. गाढवांविषयी तर त्यांच्या मालकासारखेच नगरपालिकेलाही काहीही देणे-घेणे नाही. कामासाठी गाढवांना नेले जाते; पण काम संपल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडून दिले जाते. ही गाढवे रस्त्यावर प्रचंड घाण करतात आणि वाहतुकीला अडथळाही आणतात.

सातारा नगरपालिकेकडे कोंडवाडा (पशू ठेवण्यासाठीची जागा) नसल्यामुळे जनावरे पकडली, तरी त्यांचे पुढे काय करायचे ? हा प्रश्न पालिकेसमोर आहे. ‘कोंडवाडा’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवून शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न कायमचा सोडवावा. कराड नगरपालिकेचा आदर्श घेऊन जनावरे आणि श्वान यांच्या मालकांना दंड केल्यास ‘स्वच्छ सातारा, सुंदर सातारा’ ही संकल्पना केवळ स्वप्नवत् न रहाता प्रत्यक्षात उतरेल, हे निश्चित !

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा