शत्रू राष्ट्रांशी भविष्यात काय संघर्ष होऊ शकेल, याची चुणूक आम्हाला सध्या दिसत आहे ! – सैन्यदलप्रमुख नरवणे
नवी देहली – अण्वस्त्रसज्ज असणार्या शेजारी देशांनी सीमावाद चिघळत ठेवला आहे, तसेच त्यांच्याकडून छुपे युद्धही लढले जात आहे. त्यामुळे उत्तर सीमेवर आपण कायमच दक्ष आहोत. याचाच एक भाग म्हणून सैन्याच्या पुनर्रचनेस प्रारंभ करण्यात आला आहे. तिन्ही संरक्षण दलांचा एकत्रित वापर करण्यासाठी त्यांच्यात योग्य ताळमेळ राखण्यात आला आहे. भविष्यात काय संघर्ष होऊ शकेल, याची चुणूक आम्हाला सध्या दिसत आहे. केवळ आघाडीवरूनच नव्हे, तर विविध माहितीस्रोत, सायबर विश्व, वादग्रस्त सीमा येथे या घडामोडी घडत आहेत, असे विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केले आहे. ते ‘सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज्’ या संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी पाकिस्तान आणि चीन या शेजारी देशांचा थेट उल्लेख न करता त्यांच्याकडून असणार्या धोक्याविषयी सूचित केले. ‘आपला देश सध्या एका वेगळ्याच, अतिशय कठीण आणि बहुस्तरीय सुरक्षा आव्हानांना तोंड देत आहे’, असे ते म्हणाले.
We are witnessing trailers of future conflicts: #Armychief #GenMMNaravane on #India‘s security challengeshttps://t.co/BsVWWgrPWt
— The Tribune (@thetribunechd) February 3, 2022
जनरल नरवणे पुढे म्हणाले की,
१. देशाच्या उत्तर सीमेवर घडलेल्या काही घटनांमुळे धोका अधोरेखित झाला आहे. आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता याचे रक्षण करायचे असल्यास सीमेवर अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्वोच्च सैनिकी सिद्धता असणे आवश्यक आहे.
२. एखाद्या देशातील विशिष्ट शक्तींना हाताशी धरून उपद्रव करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, हे अफगाणिस्तानमधील घडामोडींवरून सिद्ध झाले आहे. आपले शत्रू हे नेहमीच त्यांची सैनिकी उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करत रहातील. आपण पुरेसे सैनिकी सामर्थ्य राखल्यानेच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानसमवेत केलेली शस्त्रसंधी यशस्वी ठरली आहे.