पिंपरी-चिंचवडचे (पुणे) माजी उपमहापौर आणि भाजपचे घोळवे यांना लाच प्रकरणी अटक !
असे भ्रष्ट लोकप्रतिनिधी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळेच भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल ! – संपादक
पिंपरी (जिल्हा पुणे) – येथील जागा मेट्रोच्या प्रकल्पात जात असल्याने व्यापार्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देतो, असे सांगून लाच घेतल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी महंमद अली शेख यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यांनी तक्रारदाराकडून पूर्वीच ५५ सहस्र रुपये घेतले होते. अजून १ लाख रुपयांची मागणी केली; मात्र तक्रारदाराने पुन्हा पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती, तसेच अन्य व्यावसायिकांकडून ‘भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश’ या संस्थेमध्ये १ सहस्र २०० रुपयांच्या पावत्या फाडून घेतल्या.