सांगलीतील ‘बी.एस्.एन्.एल्.’च्या तार चोरी प्रकरणी महापालिकेतील नगरसेवकाचा सहभाग ! – दीपक माने, सरचिटणीस, भाजप
असे लोकप्रतिनिधी जनतेला काय न्याय देणार ? भ्रष्ट लोकप्रतिनिधींना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक
सांगली, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणाहून झालेल्या ‘बी.एस्.एन्.एल्.’च्या तार चोरी प्रकरणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील विजयनगर येथील एका नगरसेवकाचा सहभाग आहे. या प्रकरणी पोलिसांवर विद्यमान सरकारमधील मंत्र्यांचा दबाव असण्याची शक्यता आहे. तरी या प्रकरणी पोलिसांनी निष्पक्ष आणि पारदर्शक अन्वेषण करून कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पोलिसांना दिले आहे, अशी माहिती भाजप सरचिटणीस दीपक माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गटनेते विनायक सिंहासने, भाजप नगसेविका कल्पना कोळेकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर उपस्थित होते.
या वेळी दीपक माने म्हणाले, ‘‘एस्.एफ्.सी. मेगा मॉल’ ते काँग्रेस भवनपर्यंतची ‘बी.एस्.एन्.एल्.’ची ४५ लाख रुपयांची तांब्याची तार चोरी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ५०० मीटर लांबीच्या एका संचात १२ सहस्र तारा असून, अशा प्रकारचे ७ संच चोरीस गेले आहेत. या प्रकरणाची तक्रार भारत संचारच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी चोरीसाठी वापरण्यात आलेल्या क्रेन चालकाकडे पोलिसांनी अन्वेषण केले असता त्यांनी विजयनगर येथील एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून ही क्रेन त्या ठिकाणी आणल्याचे सांगितले. या नगरसेवकाला वाचवण्यासाठी पोलीसदलावर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. या प्रकरणी पुढील कारवाई न झाल्यास भाजपकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’’