मंत्रीमंडळातील मूठभर आमदारांनी एकांगी निर्णय घेत महाराष्ट्रावर मद्यविक्रीचा निर्णय लादला ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर
‘व्यसनमुक्त युवक संघा’चे राज्य सरकारच्या किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्री करण्याच्या निर्णयाच्या विरोधात सातारा येथे ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन !
सातारा, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – मंत्रीमंडळातील मूठभर आमदारांनी एकांगी निर्णय घेत महाराष्ट्रावर मद्यविक्रीचा निर्णय लादला. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे ‘व्यसनमुक्त युवक संघ’ होय ! आज सरकारला चेतावणी देण्यासाठीच आंदोलन करण्यात आले, असे प्रतिपादन ‘व्यसनमुक्त युवक संघा’चे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले. राज्य सरकारच्या किराणा मालाच्या दुकानात वाईन ठेवण्याच्या निर्णयाच्या विरोधात ‘व्यसनमुक्त युवक संघा’च्या वतीने ३ फेब्रुवारी या दिवशी दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. (सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात वारकर्यांना आंदोलन करावे लागते, हे सरकारसाठी लज्जास्पद आहे ! आतातरी सरकारने लोकभावनेचा विचार करून वाईनच्या संदर्भातील निर्णय मागे घ्यावा ! – संपादक)
ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले,
१. राज्यातील नेते आणि त्यांची मुले मद्यपान करून रस्त्यावर पडतात. याचे पुरावे माझ्याकडे आहेत.
२. लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे, त्यावर आम्ही अप्रसन्न आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा अपसमज झाला. त्यामुळे आम्हाला रोखण्यात आले; मात्र काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्याची अनुमती पोलिसांनी दिल्याने मी त्यांचे आभार मानतो.
३. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रूप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाईन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती अल्प होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल.