पोलीस वसाहतीतील दुरवस्था आणि असंवेदनशीलता
पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्याने व्यक्त केलेली व्यथा !
‘पोलीस वसाहतीमधील खोल्या पुष्कळ जुन्या झाल्या आहेत. त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक मासात पोलीस कर्मचार्याच्या वेतनातून ठराविक रक्कम कपात करण्यात येते. या खोल्यांच्या दुरुस्तीचे दायित्व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. पोलीस वसाहतीमधील खोल्यांच्या दुरुस्तीची निविदा प्रत्येक वर्षी न काढता २ वर्षांतून किंवा काही वेळेला ७-८ वर्षांतून एकदा काढली जाते. त्या माध्यमातून वसाहतीमधील खोल्यांना रंग देणे, तसेच दारे, फरशी इत्यादींची दुरुस्ती केली जाते. ज्या कर्मचार्याला खोली मिळाली, त्यानेच नळ आणि पंखे यांची दुरुस्ती करावयाची असते. बहुतांश कामे ही मार्च मासात निविदा काढून करण्यात येतात. कंत्राटदाराकडून ही कामे व्यवस्थित केली जात नाहीत. तसेच ते काही कामे अपूर्णावस्थेत ठेवून निघून जातात. अनेक निवासांवर लावलेली कौले १० ते २० वर्षांपूर्वीची, म्हणजे निवास बांधले, तेव्हाची आहेत. ती फुटलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामध्ये त्यांतून पाणी गळते. पिण्याचे पाणी आणि ड्रेनेज यांची पाईप लाईन कायमच नादुरुस्त असते.’
– एक पोलीस कर्मचारी