रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या ‘लवण पर्वतदान’ पूजेच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
१. पूजेच्या आदल्या दिवशी पुष्कळ अस्वस्थता वाटणे, रात्री व्यवस्थित झोपही न येणे, रात्री ‘सद्गुरु निकमतात्या काठीचा आवाज करत आले आहेत’, असे जाणवणे आणि त्यानंतर शांत झोप लागणे
‘लवण पर्वतदान पूजे’च्या आदल्या दिवशी, म्हणजे २.६.२०१९ या दिवशी मला पुष्कळ अस्वस्थता वाटत होती. मला रात्री व्यवस्थित झोपही येत नव्हती. माझ्या शरिराला मुंग्या आल्या आणि छातीतील धडधड वाढली होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ छातीवर ठेवून झोपले. मला काहीच सुचत नव्हते. रात्री ११.३० वाजता ‘सनातनचे सद्गुरु निकमतात्या काठीचा आवाज करत आले आहेत’, असे जाणवले. त्यांनी केलेली पुढील प्रार्थना मला पुष्कळ वेळ ऐकू येत होती, ‘सनातनच्या सर्व साधकांचे वाईट शक्ती आणि वाईट विचार यांच्या आक्रमणांपासून रक्षण होऊ दे’. त्यानंतर मला शांत झोप लागली आणि एकदम सकाळीच जाग आली.
२. पूजेच्या वेळी आलेल्या अनुभूती
२ अ. पूजेच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पूजा करत असतांना त्या श्री लक्ष्मीदेवीच्या विराट रूपात दिसणे : ३.६.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘लवण पर्वतदान’ पूजेच्या स्थळी नामजपादी उपायांसाठी बसल्यावर मला पुष्कळच चैतन्य जाणवत होते. त्या वेळी माझे मन पूर्णपणे निर्विचार झाले होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पूजा करत होत्या. तेव्हा मी डोळे मिटल्यावर त्या दोघी मला श्री लक्ष्मीदेवीच्या विराट रूपात दिसत होत्या. दोघींच्या हातांत दोन मोठे दंड दिसत होते. त्यांनी ते दंड ५ मिनिटे भूमीवर आपटले. त्यांचा आवाज ऐकू येत होता. ‘पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींना त्या आवाजाने त्रास होत आहे. त्या शक्ती दंडाखाली दबल्या आहेत’, असे जाणवले.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दोन मोठ्या कमळांमध्ये विराट रूपात दिसणे अन् त्यांनी साधकांना आशीर्वाद देणे : नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दोन मोठ्या कमळांमध्ये विराट रूपात दिसू लागल्या. त्या साधकांना आशीर्वाद देत होत्या. त्यांच्यापुढे साधक लहान आकारात दिसत होते. ‘पुष्कळ तेजतत्त्व आणि देवीतत्त्व प्रक्षेपित होऊन ते आम्हा साधकांना प्राप्त होत आहे’, असे जाणवले. माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी पुष्कळ संवेदना जाणवत होत्या.
२ ई. पूजा चालू असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या सहस्रारचक्रावर कमळ उमलले आहे’, असे जाणवले. त्या वेळी पुष्कळ देवीतत्त्व जाणवत होते.
‘हे गुरुमाऊली, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या पूजेच्या माध्यमातून चैतन्य दिले’, याविषयी कोटीशः कृतज्ञता !’
-श्रीमती अनिता भोसले, कराड, (३. ६. २०१९)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |