कर्मयोग्याप्रमाणे निरपेक्षतेने जीवन जगणारे मुंबई येथील कै. जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे) !
मुंबई येथील जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे) यांचे ४.१.२०२२ या दिवशी हृदयविकाराने निधन झाले. ४.२.२०२२ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. प्रामाणिकपणे आणि कौशल्याने नोकरी केल्यामुळे ‘आय्.डी.बी.आय्.’ या मोठ्या अधिकोषात उच्च पदावर नेमणूक होणे
‘माझे पती जयंत नारायण गोडबोले वर्ष १९७४ पासून आय्.डी.बी.आय्. (इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) या अधिकोषात नोकरी करत होते. त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि कौशल्य पाहून त्यांना भारतीय शासनाने मलेशियातील शासकीय आस्थापनात मार्गदर्शक आणि समन्वयक (गर्व्हमेंट कंपनीचे ॲडव्हायजर) म्हणून ५ वर्षे नेमले होते. ते भारतात परत आल्यावर आय्.डी.बी.आय्. अधिकोषात ६ वर्षे कार्यकारी संचालक (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) होते. निवृत्तीच्या वेळी वर्ष २००५ मध्ये त्यांनी आय्.डी.बी.आय्.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर) म्हणून कार्यभार सांभाळला.
२. निरपेक्षता
अ. आय्.डी.बी.आय्. अधिकोषाच्या कार्यपद्धतीप्रमाणे अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यावर गोडबोले तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांना भेटायला गेले. त्या वेळी अर्थमंत्र्यांना वाटले, ‘गोडबोले यांना अध्यक्षपदावर अधिक काळ रहायचे असेल किंवा अन्य काही काम असेल’; म्हणून अर्थमंत्री आरंभी त्यांना म्हणाले, ‘‘मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही.’’ त्यावर गोडबोले त्यांना म्हणाले, ‘‘मी केवळ शासकीय कार्यपद्धत म्हणून आपल्याला भेटायला आलो आहे. मला आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. मी समाधानी आहे.’’
आ. गोडबोले यांनी त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांचे सहकारी, उद्योगपती, व्यावसायिक, खातेदार आदींना निरपेक्षपणे साहाय्य केले.
३. कर्मयोग्याप्रमाणे सतत कार्यरत रहाणे
गोडबोले यांना निवृत्तीनंतर काही मोठ्या ६ आस्थापनांनी स्वतंत्र संचालक (इंडिपेन्डेट डायरेक्टर) म्हणून नेमले होते. सर्वांना त्यांच्या अनुभवावर आणि नैपुण्यावर विश्वास असल्याने ‘झुआरी ॲग्रो केमिकल्स लिमिटेड’, ‘इमामि इंडिया’, ‘गुजरात सिमेंट’, ‘युनायटेड प्रोव्हिजन’, यांसारख्या आस्थापनांनी त्यांना संचालकपदी नेमले. ते ती सेवा अत्यंत प्रामाणिकपणे आणि आनंदाने करायचे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे त्यांच्या सर्व सेवा ‘ऑनलाईन’ चालू होत्या. ते कर्मयोग्याप्रमाणे नेहमी कार्यरत राहून निरपेक्षपणे सेवा करायचे.
४. सनातन संस्थेशी संपर्क
४ अ. कार्यालयात जागेची अडचण आल्यावर स्वतःच्या घरी सनातनचा सत्संग चालू करण्यास अनुमती देणे : वर्ष २००० मध्ये आय्.डी.बी.आय्.मध्ये कार्यरत असणार्या सनातनच्या साधिका (कै.) सौ. सुरेखा केणी यांच्या पुढाकाराने आय्.डी.बी.आय्. टॉवर्स (कफ परेड, मुंबई) येथील कार्यालयात सनातनचा सत्संग चालू झाला होता; परंतु कार्यालयात सत्संगासाठी योग्य जागा मिळत नव्हती. तेव्हा सुरेखाताई कार्यकारी संचालक गोडबोलेसाहेबांना भेटल्या आणि त्यांना जागेची अडचण सांगितली. गोडबोले यांना सत्संगाचे महत्त्व समजल्यावर त्यांनी सुरेखाताईंना सांगितले, ‘‘तुम्ही आमच्या घरी सत्संग घेऊ शकता.’’ तेव्हा आम्ही कार्यालयाजवळ आय्.डी.बी.आय्.च्या अधिकार्यांसाठी असलेल्या सदनिकेत रहात होतो. मलाही सत्संगाची ओढ होती. आमच्या घरी दुपारच्या जेवणाच्या सुटीत प्रतिदिन सत्संग चालू झाला, तसेच काही दिवसांनी सनातनचे साधक आणि समाजातील लोक यांच्यासाठी आठवड्यातून एकदा इंग्रजी सत्संग चालू झाला. त्यामुळे आमच्या घरातील वातावरणात चांगला पालट झाला.
४ आ. घरी होत असलेल्या सत्संगाला कार्यालयातून विरोध झाल्यावर त्याला सडेतोड उत्तर देऊन सत्संग चालू ठेवणे : आम्ही आय्.डी.बी.आय्.च्या शासकीय सदनिकेत रहात होतो. घरी प्रतिदिन दुपारी जेवणाच्या सुटीत आय्.डी.बी.आय्.च्या कर्मचार्यांसाठी सनातनचा सत्संग चालत असे. कार्यालयातील एका व्यक्तीने शासकीय घरात सत्संग घेण्यावर आक्षेप घेतला. तेव्हा गोडबोले यांनी आय्.डी.बी.आय्.कार्यालयाला लेखी कळवले, ‘आमच्या घरी देवपूजा केली जाते. आम्ही आमच्या धर्मानुसार धर्माचरण म्हणून सत्संग घेतो. त्याला धर्मनिरपेक्षता किंवा शासकीय कार्यपद्धतीचे कारण सांगून आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.’ त्यामुळे वर्ष २००५ पर्यंत, म्हणजे आम्ही ती सदनिका सोडेपर्यंत सत्संग चालू होता. सत्संगामुळे अनेक जणांनी साधना चालू केली आणि आय्.डी.बी.आय्.चे बरेच कर्मचारी सनातनच्या कार्याशी जोडले गेले अन् ते साधना करू लागले.
५. पत्नीला समाजकार्य आणि साधना करण्यास प्रोत्साहन देणे
यजमानांनी मला समाजकार्य, धर्मकार्य आणि साधना करायला प्रोत्साहन दिले. त्यांनी मला महाराष्ट्र सरकारच्या ‘वुमेन्स कौन्सिल’ आणि सनातन संस्था येथे सेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
६. मुलाचे निधन झाल्यावर सून आणि नातवंडे यांची सर्वतोपरी काळजी घेणे
आमच्या मुलाचे (विवेक गोडबोले याचे) निधन झाले. तेव्हा त्याची दोन्ही मुले लहान (१० – ११ वर्षांची) होती. गोडबोले यांनी सून (श्रीमती गीता विवेक गोडबोले) आणि नातवंडे यांची सर्वतोपरी काळजी घेतली. गोडबोले यांनी त्यांना कशाचीही उणीव भासू दिली नाही. ‘सुनेने स्वावलंबी व्हावे’, यासाठी गोडबोले यांनी तिला अधिकोषात नोकरी लावली. त्यामुळे तिच्यातील आत्मविश्वास वाढला आणि ती शक्य होईल तेवढी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना अन् सेवा करत राहिली.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणे
माझ्या यजमानांची गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) श्रद्धा होती. ते त्यांच्या कार्यालयीन कामासाठी गोवा येथे गेल्यावर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे. ते ध्यानमंदिरात बसून जप करायचे. त्यांची आय्.डी.बी.आय्.चे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांनी त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिले. ‘गुरुदेवांमुळेच मला बढती मिळाली’, असे ते आनंदाने सांगत होते.
८. निधनापूर्वी एक मास स्वतःचा अंत जवळ येत असल्याची चाहूल लागणे
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रक्षण होण्यासाठी यजमान सतत ‘हनुमानचालिसा’ आणि अन्य स्तोत्रे यांचे पठण करायचे अन् इतरांनाही त्याविषयी आठवण करून द्यायचे. यजमानांच्या निधनापूर्वी एक मास ते त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांना भ्रमणभाष करून सांगत होते, ‘‘आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. देवाने आपला हात धरला आहे. तो कधी सोडू नका. ईश्वर नेहमी आपल्या समवेत असणार आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवा.’’ ‘जणूकाही त्यांना स्वतःचा अंत जवळ येत असल्याची चाहूल लागली होती. त्यांची ईश्वरावरील श्रद्धा वाढत होती अन् ते इतरांनाही श्रद्धा वाढवण्यास प्रोत्साहन देत होते’, असे मला वाटले.
९. साधिकेला यजमानांच्या निधनाच्या वेळी गुरुकृपेने स्थिर रहाता येणे
माझ्या यजमानांचे निधन झाले. तेव्हा मी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या वेळी कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती अत्यंत कठीण होती, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आणि माझी सून श्रीमती गीता विवेक गोडबोले हिला स्थिर रहाता आले. आम्ही दोघी त्या वेळी नामजप करत होतो. कोरोनाच्या नियमांचे पालन करून यजमानांचे अंत्यविधी आणि अन्य विधी करता आले.
‘माझ्या सुख-दुःखात साथ देऊन मला साधनेत साहाय्य करणारे यजमान मला लाभले’, याबद्दल मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती ललिता जयंत गोडबोले (पत्नी, वय ७३ वर्षे), नेरूळ, नवी मुंबई. (२८.१.२०२२)
कै. जयंत नारायण गोडबोले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
‘मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना मी काही वेळा जयंत गोडबोले आणि त्यांचे कुटुंबीय यांना भेटत असे. त्या वेळी मला त्यांची लक्षात काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. उच्चपदस्थ असूनही साधी रहाणी असणे
‘गोडबोले ‘आय्.डी.बी.आय्.’ या अधिकोषाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. नोकरी करत असतांना ते त्यांना आस्थापनाने दिलेल्या मुंबईतील कफ परेड येथील आलिशान सदनिकेत रहायचे. ते निवृत्त झाल्यावर नवी मुंबईतील एका सदनिकेत राहिले. त्यांची वेशभूषा साधी होती. त्यांनी आय.आय.टी. मुंबई येथून ‘केमिकल इंजिनीयरिंग’ आणि ‘जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’मधून ‘अर्थशास्त्र’ या विषयांत शिक्षण घेतले होते, तरीही ते एवढे साधे होते की, ‘त्यांच्याशी बोलतांना ते उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावर काम करणारे आहेत’, हे माझ्या लक्षात येत नसे.
२. मनमोकळेपणा
ते माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचे. ते मोठ्या आस्थापनातील कार्याध्यक्ष असूनही सहजतेने बोलायचे.
३. अहं अल्प असणे
एकदा मी त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत एका कठीण प्रसंगाविषयीची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेव्हा ते पोलिसांशी नम्रपणे बोलले. प्रत्यक्षात ते स्वतःची ओळख करून देऊन आणि पोलीस आयुक्तांशी बोलून त्यांची अडचण सोडवू शकले असते; पण त्यांनी तेथे एक सर्वसाधारण नागरिक म्हणून भूमिका निभावली. तेव्हा ‘त्यांच्यात अहं अल्प आहे’, असे मला जाणवले.
४. सनातनच्या साधकांवरील प्रेम
सेवेसाठी नवी मुंबई येथे गेल्यावर मी त्यांना त्यांच्या घरी काही वेळा भेटलो. तेव्हा ते मला जेवण किंवा खाऊ द्यायचे. ते मला वेळ देऊन माझ्याशी ‘समाज, धर्म आणि साधना’ यांविषयी मनमोकळेपणाने चर्चा करायचे. त्यांना काही गोष्टी पटत नसल्या, तरीही ते त्यांचे मत तत्त्वनिष्ठतेने सांगायचे. सनातनचे साधक त्यांच्या घरी गेल्यावर ते प्रेमाने साधकांची विचारपूस करायचे.
५. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे
सर्वसाधारणपणे मोठ्या पदावरील व्यक्तींना ‘देव आणि धर्म’ यांविषयी विशेष आवड नसते. ते कुटुंबियांनाही साधना आणि धर्माचरण करण्यात साहाय्य करतांना दिसत नाहीत; परंतु गोडबोले यांनी शेवटपर्यंत त्यांची पत्नी आणि सून यांना साधना अन् सेवा यांत साहाय्य केले. ‘त्यांनी स्वतःचे पद आणि अनुभव यांचा उपयोग स्वार्थासाठी न करता ‘समाज अन् धर्मकार्य’, यांसाठी केला’, असे मला वाटते.
६. कर्मयोगानुसार साधना करणे
गोडबोले जीवनभर निरपेक्षपणे कार्यरत राहिले. सध्याच्या काळात एका मोठ्या शासकीय आस्थापनातील उच्चपदस्थ व्यक्ती नैतिक मूल्यांची जोपासना करून निरपेक्षपणे कार्य करत असल्याचे उदाहरण क्वचितच पहायला मिळते. ‘गोडबोले शेवटपर्यंत वेगवेगळ्या आस्थापनांत संचालक पदावर एका कर्मयोग्याप्रमाणे साधना करत होते’, असे मला वाटते.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.१.२०२२)
स्वतःतील प्रामाणिकपणामुळे उद्योगपतींच्या कौतुकाला पात्र ठरलेले कै. जयंत नारायण गोडबोले !
१. धर्मकार्यात साहाय्य करणे
गोडबोले यांनी मला ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवण्यासाठी, तसेच रामनाथी आश्रमाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य मिळवण्यासाठी त्यांच्या परिचयातील व्यक्तींचे संपर्क दिले. त्यांच्या संपर्कातील उद्योगपतींनी धर्मकार्यासाठी चांगल्या प्रकारे साहाय्य केले. त्यांपैकी काही उद्योगपती अजूनही धर्मकार्यासाठी साहाय्य करतात.
२. उद्योगपतींनी गोडबोले यांचे ‘प्रामाणिक व्यक्ती’, असे कौतुक करणे
व्यावसायिकांना गोडबोले यांच्याविषयी आदर होता. ते सर्व जण त्यांचे कौतुक करायचे. ते मला म्हणतात, ‘‘आमच्या व्यावसायिक अनुभवानुसार गोडबोले यांच्याएवढी प्रामाणिक व्यक्ती आम्ही पाहिली नाही. त्यांना दिवाळीची भेट पाठवल्यावर ते केवळ मिठाई घ्यायचे आणि भेटवस्तू परत पाठवायचे. एवढेच नव्हे, तर आम्ही पाठवलेल्या भेटवस्तूंच्या समवेत ते आम्हाला त्यांच्याकडची मिठाईही पाठवायचे. त्यांच्या पत्नी श्रीमती ललिता गोडबोले त्यांच्याप्रमाणेच निःस्वार्थी आहेत. त्यांनी आम्हाला नेहमी निरपेक्षपणे साहाय्य केले.’’
त्यांच्या निधनाने सर्वांना दुःख झाले. ‘या कलियुगातही अशी प्रामाणिक व्यक्ती होती’, याचे मला आश्चर्य वाटते.’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१.२०२२)