मुंबई महापालिकेचा ४५ सहस्र ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर !
मुंबई – मुंबई महापालिकेचा ४५ सहस्र ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी या दिवशी महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. यामध्ये ‘सर्वांसाठी पाणी’ हे धोरण महापालिकेने घोषित केले आहे. याआधीही सत्ताधारी शिवसेनेने २४ घंटे पाणी देण्याचे मुंबईकरांना आश्वासन दिले होते; मात्र याचा केवळ प्रायोगिक प्रकल्प मुलुंड-वांद्रे पश्चिम या दरम्यान चालू करून नंतर तो बंद पडला आहे.
BMC budget 2022: मुंबई मनपाचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प सादर, वाचा मुंबईकरांना काय-काय मिळालं?#BMCBudget #Mumbai #BMC #Budget https://t.co/bxU3YHlrjY
— News18Lokmat (@News18lokmat) February 3, 2022
या अर्थसंकल्पात मुंबईत खार्या पाण्यापासून गोडं पाणी सिद्ध करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खार्या पाण्यातून २०० दशलक्ष लिटर गोडं पाणी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा तलावावर २० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे. ८० मेगावॅट क्षमतेचा तरंगत्या सौरउर्जा प्रकल्पासाठी १० कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलवहन बोगद्यांसाठी ४६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईकरांच्या आरोग्यासाठी २०० शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील ३ सहस्र ५०० उपाहारगृहांना कचर्याकरता वापरकर्ता शुल्क आकारण्यात येणार आहे. वापरकर्ता शुल्कातून १७४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
विकास नियोजन खात्याकडून मिळणारे उत्पन्न १४ सहस्र ७५० कोटी रुपये अपेक्षित आहे. ५०० चौ. फूट किंवा त्यापेक्षा अल्प चटईक्षेत्र असलेल्या १६ लाख १४ सहस्र निवासी मालमत्तांना मालमत्ता करामधून १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.