हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी श्रीविष्णु, श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे नामजप करतांना चंद्रपूर येथील सौ. सत्याली देव यांना आलेल्या अनुभूती
१. समष्टी स्तरावरील नामजप करायला लागल्यावर प्रथम आध्यात्मिक त्रास होणे आणि ‘सनातन प्रभात’मध्ये त्या नामजपांचे महत्त्व वाचल्यानंतर ते नामजप करतांना ‘व्यष्टी स्तरावर कसा भाव ठेवायचा ?’, हे सुचणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करून श्रीविष्णु, श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे नामजप करायला सांगितले होते. त्यानुसार नामजप करतांना पहिल्या दिवशी मला आध्यात्मिक त्रासांमुळे अतिशय झोप यायची. दुसर्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने सांगितलेले या ३ देवतांच्या नामजपांचे महत्त्व वाचले आणि त्याच विचारात मी नामजप करायला बसले. तेव्हा देवाने ‘नामजप करतांना व्यष्टी स्तरावर कसा भाव ठेवायचा ?’, हे मला सुचवले.
२. नामजप करतांना व्यष्टी स्तरावर कसा भाव ठेवू शकतो ?
अ. कुठलीही पूजा करतांना कळत-नकळत झालेल्या चुकांतून घडलेल्या पापांचे क्षालन व्हावे; म्हणून शेवटी ३ वेळा श्रीविष्णूचा नामजप करायला सांगतात. त्यानुसार ‘आपल्याला ‘हिंदु राष्ट्र’ आणायचे आहे, तर आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे झालेल्या पापांचे क्षालन होण्यासाठी आपल्याला ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करायचा आहे’, हे माझ्या मनात आले.
आ. स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी प्रक्रिया राबवतांना येणारा बुद्धीचा अडथळा दूर होण्यासाठी ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ हा नामजप करणे आवश्यक आहे; कारण ती बुद्धीची देवता आहे.
इ. गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करतांना साधनेत अडथळे येतात. त्यांवर मात करण्यासाठी क्षात्रभाव निर्माण व्हावा; म्हणून ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हा नामजप करायचा आहे.
३. वरीलप्रमाणे भावपूर्ण नामजप केल्यावर आध्यात्मिक त्रासही न्यून होणे
देवाने सुचवल्यानुसार मी वरीलप्रमाणे भाव ठेवून तीनही देवतांचे नामजप केले. तेव्हा माझ्याकडून नामजप भावपूर्ण झाले आणि माझा आध्यात्मिक त्रासही न्यून झाला.
‘हे गुरुदेवा, ‘आमची साधना व्हावी’, यासाठी तुम्हीच आम्हाला वेगवेगळे भाव सुचवता आणि तसे प्रयत्न आमच्याकडून करवून घेता’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– गुरुचरणी येण्यास व्याकुळ झालेली,
सौ. सत्याली देव, चंद्रपूर (५.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |