नागपूर येथील गुन्हेगारी आणि पोलिसांचे दुर्लक्ष !
नागपूर येथे गेल्या काही मासांत गुन्हेगारांच्या टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या ९ मासांत नागूपर शहरात हत्या, मारामार्या, बलात्कार, विनयभंग यांसारखे गुन्हे वाढलेले आहेत. गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत ठरवून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी यापूर्वी २५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे स्थानांतर करूनही काही लाभ झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे ‘पोलीस करतात काय ?’ अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टता, निष्क्रीयता आणि अकार्यक्षमता यांमुळे पोलिसांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली नसल्याचे पुढे येत आहे.
१. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागपूरची राज्यातील ‘क्राईम कॅपिटल’ (गुन्ह्यांची राजधानी) अशी ओळख !
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून होणारे गंभीर गुन्हे पोलीस यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत. यामुळेच दुर्दैवाने नागपूरला राज्यातील ‘गुन्ह्यांची राजधानी’ म्हणून ओळख मिळत आहे. जवळपास ३७ लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहराने वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गुन्हेक्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरने हे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे या क्षेत्रात नागपूर शहराने त्याची वाटचाल आता राष्ट्रीय पातळीकडे चालू केली आहे !
२. देहली, पाटणा आणि लखनऊ या शहरांच्या तुलनेतही नागपूरमध्ये गुन्हेगारी अधिक !
नुकत्याच घाेषित झालेल्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार नागपूरमधील गुन्हेगारीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपूर शहरात वर्षाकाठी सरासरी हत्येच्या १०० घटना घडतात. ही संख्या पाटणा, लखनऊ आणि देहली यांसारख्या शहरांपेक्षा अधिक आहे. राज्यातील पुणे हे शहर या सूचीत १० व्या, तर मुंबई १६ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता नागपूर शहरात कायद्याचे राज्य आहे कि गुन्हेगारांचे या प्रश्नाचे उत्तर नागपूर पोलीस यंत्रणेला द्यावे लागणार आहे.
३. कुख्यात गुंड रणजित सफेलकर याने सरकारी भूमी बळकावून राजमहाल नावाचा ‘सेलिब्रेशन हॉल’ बांधला !
नागपूर येथील कामठी रस्त्यावर असलेला ‘राजमहल’ नावाचा ‘सेलिब्रेशन हॉल’ गुंड रणजित सफेलकर आणि त्याचे २ साथीदार गेली अनेक वर्षे चालवत आहेत. विवाह समारंभ आणि इतर समारंभ यांसाठी लाखो रुपये मोजून हा ‘हॉल’ भाड्यावर दिला जात होता. नागपूर येथील नीमगडे हत्येच्या खटल्यात गुन्हे शाखा पोलिसांना रणजित आणि त्याचे साथीदार यांचा सहभाग आढळून आल्यानंतर चालू झालेल्या अन्वेषणात पोलिसांनी सफेलकर याच्या संपत्तीचा शोध चालू केला, तेव्हा ‘सेलिब्रेशन हॉल’ हा शासकीय भूमीवर निर्माण करण्यात आल्याचा खुलासा झाला. त्यासाठी केवळ सरकारी भूमीच बळकावली नव्हती, तर त्या ठिकाणातून वहाणारा पाटबंधारे विभागाचा कालवाही सफेलकर आणि त्याचे गुंड यांनी बुजवला होता ! पोलिसांनी आता सर्व विभागांची अनुमती घेऊन तो ‘हॉल’ आणि इतर संपत्ती तोडायला प्रारंभ केला आहे.
रणजित सफेलकर याचे हे अनधिकृत बांधकाम पोलिसांना इतकी वर्षे कसे कळू शकले नाही ? सामान्य नागरिकांनी अतिक्रमण केल्यानंतर प्रशासन लगेच त्याला नोटीस देऊन ते अतिक्रमण पाडते. मग याकडे दुर्लक्ष का केले ? सफेलकर याला प्रशासनातील कोणत्ो अधिकारी किंवा कर्मचारी यांनी साहाय्य केले का ? अथवा राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे त्याला सर्व प्रशासकीय पातळ्यांवर साहाय्य मिळत गेले ? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. या अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई झाली नाही, याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरले आहे.
४. नागूपर येथे गेल्या २० वर्षांत २ सहस्र २२ हत्येच्या घटना !
नागपूर शहरात अनेक हत्येच्या घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर शहरात गेल्या २० वर्षांत २ सहस्र २२ हत्येच्या घटना घडल्या आहेत, म्हणजे वर्षाकाठी १०० हत्या होतात. वर्ष २०२० मध्ये येथे हत्येची ९७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
५. नागपूर येथे हत्येच्या घटनांचा दर ३.९ टक्के !
‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या वर्ष २०२० च्या गुन्हेविषयक अहवालानुसार प्रति १ लाख लोकसंख्येमागे नागपूर येथे हत्येच्या प्रकरणाचा दर ३.९ टक्के एवढा असून तो देशात सर्वाधिक आहे. या अहवालानुसार वर्ष २०२० मध्ये बिहारची राजधानी पाटणामध्ये हत्येची ७९ प्रकरणे नोंदवली गेली असून प्रति १ लाख लोकसंख्येप्रमाणे पाटणा येथे हत्येचा दर ३.८५ टक्के आहे. देशात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची ओळख असलेल्या शहरांपेक्षाही नागपूरची आकडेवारी अधिक आहे.
६. वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत गुन्हेगारीत वाढ !
वर्ष २०१४ ते २०२० या ६ वर्षांच्या काळात नागपूर येथे कायदा-सुव्यवस्था बेभरवशाची झाली आणि गुन्हेगार बेलगाम झाल्याचे चित्र होते.
७. कामात दुर्लक्ष केल्याने पोलिसांचे स्थानांतर !
लहान-मोठ्या गुन्ह्यांचा बाजार झालेल्या नागपूर येथील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना उत आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक अल्प असल्याचे दिसत आहे. अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी अनेक घंटे पोलीस कर्मचार्यांच्या कामाचे मूल्यमापन केले, तेव्हा अनेक कर्मचारी दिलेल्या ‘बीट’वरील (विभागातील) कामात दुर्लक्ष करत असल्याचे पुढे आले. हे दुर्लक्ष कामचुकारपणामुळे होत आहे कि भ्रष्टतेमुळे होत आहे, हे मात्र पुढे आले नाही. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांची उचलबांगडी करण्यात आली. एवढेच नाही, तर नगराळे यांच्यासह गुन्हे प्रगटीकरण (डीबी) पथकातील २५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचेही अन्यत्र स्थानांतर (बदली) करण्यात आले; हे गंभीर आणि पोलीस प्रशासनाविषयी संशय निर्माण करणारे ठरले. एखाद्या प्रकरणात पोलीस दोषी आढळले, तर त्याचे अन्यत्र स्थानांतर करण्यात येते. स्थानांतराने पोलिसांची भ्रष्टाचारी वृत्ती नष्ट होत नाही. ते जिथे जातात तिथे गुन्हेगारी, अवैध धंदे हे चालूच रहातात. नागपूर येथेही नवीन पोलीस येऊन फारसा काही फरक पडला असे झाले नाही.
८. गृहमंत्र्यांच्या दौर्यानंतर पोलिसांनी १०० गुन्हेगारांना कह्यात घेतले !
२ मासांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूर दौर्यात गुन्हेगारीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर पोलिसांनी एका आठवड्यात गुन्हेगारांच्या विरोधात ३ मोठ्या मोहिमा राबवत १०० गुन्हेगारांना कह्यात घेतले आहे. हे पोलिसांनी पूर्वी का केले नाही ? गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मोहीम राबवण्याची आवश्यकता का लागते ? यामध्ये क्रिकेट बुकी, अमली पदार्थ विक्रेते आणि अवैध शस्त्र विक्रेते यांच्यावर कारवाई केली. भारत-पाकिस्तान ‘टी-२०’ सामन्यांवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावणार्या १९ अड्ड्यांवर पोलिसांनी धाडी घातल्या. अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करत ६ घंट्यांत पोलिसांनी ६६ आरोपींना कह्यात घेतले. याचाच अर्थ पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करू शकतात. पोलिसांनी कायमस्वरूपी अशी कारवाई केल्यास गुन्हेगारी आपोआप अल्प होईल; पण ती का केली जात नाही ? हाच प्रश्न निर्माण होतो.
९. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करत नाहीत !
माजी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होता, हे पुढे आले. तसाच प्रकार नागपूर येथेही दिसत आहे. अनेक गुंडांच्या टोळ्यांतील गुन्हेगारांना राजकीय पाठिंबा असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगार समाजात उजळ माथ्याने फिरतात. त्यांच्यावर जुजबी कारवाई होते. पोलीसदल काही वेळा राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्याप्रमाणे वागते. राजकीय हस्तक्षेप असल्यास पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करू शकत नाहीत. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळेच पोलीस दलात भ्रष्टाचार फोफावला आहे. त्यामुळे ‘चांगले काम करणार्या अधिकार्यांची कुंचबणा आणि भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांना बढती’, असेच चित्र सध्या पोलीसदलात दिसून येत आहे.
१०. पोलिसांची भ्रष्ट मानसिकता पालटणे आवश्यक !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रतिमास १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. ठाणे येथील मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे, सुनील माने, रियाझुद्दीन काझी यांनाही अटक करण्यात आली. यासमवेत महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलीस यांची अनेक प्रकरणे पाहिली असता पोलिसांचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले दिसतात. त्यामुळे नुसते स्थानांतर करून गुन्हेगार पकडले जाणार नाहीत; पोलिसांची भ्रष्टाचार करण्याची मानसिकता पालटणे आवश्यक आहे.
११. पोलिसांनी कर्तव्यनिष्ठ होण्यासाठी धर्माचरणी झाले पाहिजे !
पोलिसांचे मनोबल वाढवून त्यांना धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी बनवले पाहिजे. धर्माचरणी माणूस हा कर्तव्याप्रती जागरूक असतो. पोलिसांसाठी कार्यशाळा आयोजित करून पोलीस कर्मचार्यांना धर्माचरणाचे आणि नैतिकतेचे धडे दिले पाहिजेत. त्यामुळे पोलिसांमध्ये आत्मबल वाढून त्यांच्या वृत्तीत आपोअाप पालट होईल. पोलीस प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप टाळण्याचे बळ त्यांच्यात निर्माण होईल आणि ते कर्तव्यनिष्ठ होण्यासही साहाय्य होईल. पोलिसांना धर्माचरणी करण्यासाठी समाजातील आध्यात्मिक संघटनांचे साहाय्य घेऊ शकतो. पोलीस दलातील ३० टक्के चांगले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आध्यात्मिक विचार आचरणात आणून पोलीसदलातील कर्मचार्यांत सुधारणा घडवून आणणे अशक्य नाही. पोलीस कर्तव्यनिष्ठ झाले की गुन्हेगारांवर आपोआप वचक बसेल आणि गुन्हेगारी अल्प होण्यास आळा बसेल !