संजय राऊत यांच्या निकटवर्तियाला ईडीकडून अटक !
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील पत्रा चाळ भूमी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. १ सहस्र ३४ कोटी रुपयांचा हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. प्रवीण राऊत हे एच्.डी.आय.एल्. (हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) उप-आस्थापन असलेल्या ‘गुरुआशिष कन्स्ट्रक्शन’चे संचालक आहेत. एच्.डी.आय.एल्. हे पी.एम्.सी. बँक घोटाळा प्रकरणातील सर्वांत मोठे कर्जबुडवे आस्थापन आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून कारवाई #ED #SanjayRaut #PravinRaut #MumbaiNews https://t.co/EcCo6GoZDf
— SakalMedia (@SakalMediaNews) February 2, 2022
यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये पी.एम्.सी. बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या अन्वेषणात समोर आले होते. या पैशांचा वापर दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी ‘गुरुआशिष कन्स्ट्रक्शन’ला गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर येथील पत्रा चाळीचा पुनर्विकास करण्याचे काम मिळाले होते; परंतु त्या वेळी १ सहस्र कोटी रुपयांचे चटई क्षेत्र (एफ्.एस्.आय.) वाढवून घेऊन त्यावर चाळीतील रहिवाशांसाठी सदनिका न बांधता ते स्वतःच विकले होते. या घोटाळ्याच्या प्रकरणी प्रवीण राऊत यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी तपासात सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने अनेक घंट्यांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली.