संभाजीनगर येथे कोरोनाच्या लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप !
वडिलांचा उच्च न्यायालयात १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट !
संभाजीनगर – कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करून याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी येथील उच्च न्यायालयात १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट केला आहे. या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, लस निर्मिती करणारी ‘सिरम इन्स्टिट्यूट’ आणि भागीदार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
(सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स)
दिलीप लुणावत यांची मुलगी आधुनिक वैद्या स्नेहल लुणावत या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात होत्या. आधुनिक वैद्या स्नेहल यांनी २८ जानेवारी २०२१ या दिवशी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतली; परंतु १ मार्च २०२१ या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ आणि ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ यांनी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असल्याचे म्हटले आहे; परंतु ‘हा दावा खोटा आणि चुकीचा आहे. लसीमुळे मुलीचा मृत्यू झाला आहे’, असे दिलीप लुणावत यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या एफ्.ई.एफ्.आय. या समितीने कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे, असे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे स्वतःच्या मुलीला न्याय मिळावा आणि इतर लोकांचे प्राण वाचावेत, यासाठी याचिका प्रविष्ट केली आहे, असे लुणावत यांनी म्हटले आहे.