गोव्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे ! – आरोग्य खाते
पणजी, २ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याचे प्रमाण १९ जानेवारीपासून न्यून होत आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. इरा आल्मेदा यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘पूर्वी सूचित केल्याप्रमाणे कोरोनाच्या तिसर्या लाटेत अनेक लहान मुले बाधित झाली; मात्र सुदैवाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. कोरोनाच्या तिसर्या लाटेत रुग्णालयांतील केवळ ३२५ खाटा भरल्या, तर ३ सहस्र ६७४ खाटा रिक्त आहेत. तसेच ३२५ भरलेल्या खाटांमधील ७७ खाटा या ऑक्सिजन पुरवठा असलेल्या खाटा आहेत. सध्या १५ रुग्ण अतीदक्षता विभागात, तर ५ रुग्ण ‘व्हँटीलेटर’वर आहेत.’’
कोरोनाची लागण झाल्याने मृत पावलेले ५२ टक्के रुग्ण कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेले
जानेवारी २०२२ मध्ये कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू पावलेल्या १७१ रुग्णांपैकी ५२ टक्के रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नव्हती. कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतल्या रुग्णांना आरोग्यविषयक जटील समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले आणि त्यातील काहींचा मृत्यू झाला. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रत्येकाने घेणे अत्यावश्यक आहे. गोव्यात १० सहस्र ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्राही घेतलेली नाही, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.
कोरोनाचे विविध प्रकार ओळखू शकणारे ‘जीनोम सिक्वेसिंग’ यंत्र गोव्यात १५ फेब्रुवारीनंतर कार्यान्वित होणार आहे.
निवडणुक सेवेतील कर्मचार्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीची वर्धक मात्रा देणार
विधानसभा निवडणुकीच्या कामात असलेल्या सर्व कर्मचार्यांना ‘आघाडीवर काम करणारे कर्मचारी’, असे मानून त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेऊन ३ मासांची अवधी झालेला असल्यास कोरोना प्रतिबंधात्मक वर्धक मात्रा अर्थात् ‘बूस्टर डोस’ देण्यात येणार आहे. यापूर्वी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि ६० वर्षांहून अधिक वयोगटातील व्याधींनी त्रस्त असलेल्या व्यक्ती यांना कोरोना प्रतिबधात्मक लसीची दुसरी मात्रा घेऊन ९ मासांचा कालावधी उलटल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक ‘बूस्टर डोस’ देण्यात येत होता, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सचिवांनी दिली आहे.