गोव्यात ११ लक्ष ६४ सहस्र मतदार १ सहस्र ७२२ मतदान केंद्रांतून मतदानाचा हक्क बजावणार !
पणजी, १ फेब्रुवारी (वार्ता.) – १४ फेब्रुवारी या दिवशी होणार्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ११ लक्ष ६४ सहस्र २२४ मतदार १ सहस्र ७२२ मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. जानेवारी २०२२ मध्ये एकूण ९ सहस्र ३६१ नव्या मतदारांची नावे मतदार सूचीत समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ६७६ मतदार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली. मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी पुढील महत्त्वाची सूत्रे सांगितली.
मतदारांचे वर्गीकरण
एकूण ९ सहस्र ५९० अपंग मतदार आहेत, तर २९ सहस्र ७९७ मतदार हे ८० वर्षांहून अधिक वयोगटातील आहेत. या निवडणुकीत ९ तृतीयपंथीय मतदार आणि वेश्या व्यवसाय करणार्या ४१ महिला (सेक्स वर्कर्स) मतदान करणार आहेत. विविध सेवांमध्ये असलेले २९८ मतदार ‘पोस्टल मतदाना’च्या साहाय्याने मतदान करणार आहेत.
सरकारी कर्मचार्यांनी निवडणूक प्रचार किंवा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमात सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
१३ सहस्र २८४ मतदारांना घरी राहून मतदान करण्याची सोय
अपंग आणि ८० वर्षांहून अधिक वयोगटातील मतदारांना घरी राहून मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी एकूण १३ सहस्र २८४ मतदारांनी (उत्तर गोव्यातून ५ सहस्र ९३८, तर दक्षिण गोव्यातून ७ सहस्र ३४६) अर्ज केले आहेत. ही सेवा देण्यासाठी निवडणूक आयोगाने अनुमाने १०० गट सिद्ध केले आहेत.