पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेले विलक्षण अनुभव !
पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अन् त्यांच्या स्वसंमोहन तंत्राविषयी आलेले विलक्षण अनुभव !
पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मामेआत्याची (सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांची) मुलगी, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मामे-आत्येबहीण आहे.
१ फेबुवारी २०२२ या दिवशीच्या लेखात आपण श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या यजमानांच्या निधनामुळे त्यांच्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर, त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली दैवी भेट आणि त्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाहिल्या. आजच्या लेखात ‘श्रीमती अनुपमा देशमुख यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनेक विलक्षण अनुभूती’ आणि ‘श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या साधनेमुळे देवाने मुलाला अपघातात कसे वाचवले ?’, त्या संदर्भात त्यांना आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.
(भाग ४)
(भाग ३.) ‘पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना स्वसंमोहन तंत्राविषयी आलेले विलक्षण अनुभव !’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/548822.html
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनेक विलक्षण अनुभूती !
१० अ. नामजपाविषयी आलेली अनुभूती
१० अ १. मुलीच्या लग्नाची सिद्धता चालू झाल्यावर अकस्मात् ताप येऊन आजारी पडणे : ‘वर्ष १९९५ मध्ये माझ्या मुलीचे, शीतलचे लग्न ठरले. ‘आनंद’ हा जावई मनासारखा मिळाला. माझा मुलगा सिद्धार्थ जी.एस्. मेडिकलमधून (के.इ.एम्.) ‘एम्.बी.बी.एस्.’ झाला आणि वाडिया रुग्णालयातून स्त्रीरोगतज्ञ झाला. त्याच्या ‘बॅच’मध्ये तो पहिला आला. या दोन्ही आनंददायक घटना पाठोपाठ घडल्या. लग्नाची सिद्धता चालू झाली आणि अकस्मात् मी पुष्कळ आजारी पडले. प्रतिदिन १०३ – १०४ असा ताप येऊ लागला. मला ‘के.इ.एम्.’ रुग्णालयात भरती केले. सर्व तपासण्या आणि ‘सी.टी. स्कॅन’ही झाले; पण रोगाचे निदान झाले नाही. ‘सलाईन आणि ॲन्टिबायोटिक्स’ही चालू होती. ताप उतरल्यावर मी घरी आले, तर पुन्हा ताप येऊ लागला. मग दादर येथील शुश्रूषा रुग्णालयामध्ये डॉ. तुषार मेढेकरांना दाखवायचे आणि ‘आवश्यकता असेल, तर तिथे भरती करायचे’, असे ठरले. त्या दिवशी सकाळी माझ्या मनात आले, ‘आता तीन मासांवर मुलीचे लग्न आले आणि मला हे कसले आजारपण आले ?’ मला पुष्कळ अशक्तपणा जाणवत असल्याने मी अधिक हिंडू फिरूही शकत नव्हते.
१० अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रकृतीची चौकशी करणे आणि आजारपणामागे आध्यात्मिक कारण असल्याचे सांगून गुरुचरित्र वाचण्यास अन् दत्ताचा नामजप करण्यास सांगणे : मग विचार केला, ‘बसल्या बसल्या आमंत्रणांची सूची तरी करूया.’ आरंभ परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या नावाने केला आणि ही आनंदाची वार्ता देण्यासाठी लगेच मी त्यांना दूरभाष केला. त्यांनी माझे अभिनंदन केले आणि विचारले, ‘‘बाकी सर्व ठीक आहे ना ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मला ताप येत आहे.’’ मग के.इ.एम्. मधल्या उपचारांविषयी आणि आज दुसर्या डॉक्टरांना दाखवणार असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही जमेल तेवढे गुरुचरित्र वाचा आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा जप करा; कारण हे दुखणे शारीरिक किंवा मानसिक नसून आध्यात्मिक आहे. दुखणे शाररीरिक असते, तर ‘के.इ.एम्.’वाल्यांनी तुम्हाला केव्हाच बरे केले असते. मुलीचे लग्न ठरले आणि मुलगा एम्.डी. झाला. सगळे चांगले झाल्यामुळे त्या (वाईट शक्ती) आपल्याकडे काहीतरी मागत असतात.’’ त्याक्षणी मी नामजप चालू केला. थोड्याच वेळात सिद्धार्थने (मुलाने) मला गुरुचरित्रही आणून दिले.
१० अ ३. गंभीर शारीरिक स्थिती आणि मनात येणार्या विचारांवर मात करून नामजप चालू ठेवणे : आम्ही शुश्रूषा रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्य मेढेकर यांच्याकडे गेल्यावर ‘हा १०० टक्के ‘फाल्सीपॅरम मलेरिया’ आहे’, असे सांगून त्यांनी मला तेथे भरती केले आणि ‘आय.व्ही. क्विनिन’ (सलाईनमध्ये ‘क्विनिन’ हे मलेरियाचे औषध घालून) चालू केले. ‘जराही त्रास झाला, तर लगेच कुणालाही सांगा’, असे त्यांनी बजावले. थोड्याच वेळात मला पुष्कळ थंडी वाजू लागली; म्हणून मी परिचारिकेला बोलावून ते काढायला सांगितले आणि सिद्धार्थच्या सांगण्यावरून तिने मला दोन ‘इंजेक्शन्स’ दिल्यावर थंडी वाजणे थांबले. दुपारी ‘के.इ.एम्.’मधून निरोप आल्याने सिद्धार्थ स्वागतकक्षात दूरभाष घ्यायला गेला. तेवढ्यात दुसरी परिचारिका आली आणि ते काढलेले ‘आय.व्ही.क्विनिन’ पुन्हा लावायला लागली. मी तिला सांगितले, ‘‘मला याची ‘रिॲक्शन’ आली; म्हणून ते काढले आहे.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मेढेकरसरांनी हेच उपचार सांगितले आहेत.’’ तिने ते लावल्यावर थोड्याच वेळात माझ्या डोक्यात घणाचे घाव बसल्यासारखे होऊ लागले. मी घंटा वाजवली. परिचारिका आणि आधुनिक वैद्य धावत आले. माझी नाडी ७६ वरून १६४ वर गेली. लगेच ‘इ.सी.जी.’ यंत्र आणून चालू केले आणि ‘ऑक्सिजन सिलिंडर’ आणले. सिद्धार्थही लगेच आला आणि त्याने डॉ. मेढेकरांना दूरभाष केला. प्रसंगाचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. त्या वेळी माझा नामजप सतत चालूच होता. एकीकडे मनात विचार चालू होते की, ‘आता काही मी यातून जगत नाही; पण निदान मी असतांना ‘सिद्धार्थ डॉक्टर झाला, त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि माझ्या डोळ्यांदेखत शीतलचे लग्न ठरले.’ नंतर माझ्या मनात मनात आले की, ‘सिद्धार्थच्या बायकोच्या पोटी माझा पुनर्जन्म व्हावा.’ पुन्हा वाटले की, ‘त्या छोट्या बाळाला हे कसे कळणार की, आपले जे बाबा आहेत, तो गेल्या जन्मी आपला मुलगा होता ?’ त्यामुळे मी हे सर्व विचार मनातून काढून टाकले आणि सतत नामजप चालू ठेवला.
आता सिद्धार्थला छोटी मुलगी आहे. तिचे नाव शनाया (सूर्याचा पहिला किरण) आहे. ‘ती अगदी माझ्यासारखी दिसते !’, असे लंडनमधील ओळखीचे सर्व लोकही म्हणतात.
१० अ ४. नामजप करतांना मध्येच ‘xxx’ अशी शिवी ऐकू येणे : ‘परिस्थितीकडे शांतपणे पहात रहाणे’, (‘वेट अँड वॉच’), अशी स्थिती होती. असेच ३ – ४ घंटे गेले. सिद्धार्थही ‘के.इ.एम्.’मध्ये त्याच्या कामावर (‘ड्यूटी’वर) गेला. सगळीकडे पूर्ण शांतता होती. अकस्मात् मला ‘xxx’ (शिवी) हा शब्द ऐकू आला आणि तो पुनःपुन्हा ऐकू येऊ लागला. अगदी माझ्या उजव्या कानात बोलल्यासारखी ती शिवी ऐकू येत होती. मी वॉर्डबॉयला बोलावून विचारले, ‘‘जवळपास कुणी बोलत आहे का ?’’ तो म्हणाला, ‘‘सर्व रुग्ण जेवून झोपले आहेत. ही भेटण्याची वेळही नाही. त्यामुळे इथे आसपास कुणीच नाही.’’ माझी खोली वातानुकूलित असल्याने दारे-खिडक्याही बंद होत्या. माझा जप तळमळीने चालूच होता. थोड्या वेळाने ती शिवी ऐकू येणे बंद झाले. मला असे वाटले की, या पलंगावर माझ्या आधी एखादा रुग्ण वारला असेल; म्हणून तो आवाज ऐकू येत असावा. त्यानंतर ३ – ४ दिवस माझी स्थिती गंभीर होती. ‘बोनमॅरो’ ही चाचणी केली. मला तीन बाटल्या रक्त दिले. चार दिवसांनी मला घरी पाठवण्यात आले. औषधे चालूच होती. पुष्कळ दिवसांनी माझा अशक्तपणा न्यून झाला. शीतलचे लग्न छान पार पडले. त्यानंतर सहा मासांनी सिद्धार्थ ‘एम्.आर्.सी.ओ.जी.’मध्ये नोकरी मिळाली; म्हणून लंडनला गेला.
१० अ ५. वाईट शक्तींना हाकलण्यासाठी स्वामी समर्थ शिवी देत असल्याने स्वामी समर्थांनी येऊन जीव वाचवल्याचे पू. शिरीष कवडे यांनी सांगणे : मला आजारपणातील त्या शिवीची मधूनच आठवण यायची. मी मनानेच त्याचा अर्थही लावला होता; म्हणून मी परात्पर गुरु डॉक्टरांना त्याविषयी काही सांगितले नाही. त्यानंतर ३ – ४ वर्षांनी पुण्याला पू. शिरीषदादा कवडे यांना भेटण्याचा योग आला. त्यांना हा प्रसंग सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘याचा अर्थ स्वामी समर्थांनी स्वतः तिथे येऊन तुमचा जीव वाचवला. वाईट शक्तींना हाकलण्यासाठी ते ही शिवी देत असत. जेव्हा लहान मुले आजारी असतात किंवा कुणीतरी पुष्कळ तळमळीने त्यांना प्रार्थना करते, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः येऊन त्यांना संकटातून मुक्त करतात.’’ हे ऐकल्यावर मला अतिशय आनंद झाला.
१० अ ६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच रक्षण झाल्याचे जाणवणे : माझे भाग्य थोर म्हणून मला वेळेवरच परात्पर गुरु डॉक्टरांना दूरभाष करण्याची बुद्धी झाली आणि त्यांनी माझे प्राण वाचवले. ही गोष्ट इतर कुणाच्या तोंडून ऐकली असती, तर माझा विश्वासच बसला नसता; पण मला स्वतःलाच हा अनुभव आल्याने त्याच्या खरेपणाविषयी शंकाच नाही. तेव्हापासून माझ्या घरातील सर्वजण ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ हा जप करतात, तसेच त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे परात्पर गुरु जो जप सांगतात, तोही ते करतात.
१० आ. लंडनमध्ये २ अपघातांतून मुलगा वाचल्याच्या संदर्भातील अविस्मरणीय अनुभूती
१० आ १. अकस्मात् एक नशा केलेला मुलगा गाडीवर येऊन आपटणे : वर्ष २००३ मध्ये मी लंडनला सिद्धार्थकडे (मुलाकडे) गेले होते. तेव्हा आमच्या ओळखीच्या एका कुटुंबाला घेऊन आम्ही ‘लायन किंग’ हे नाटक बघायला गेलो होतो. रात्री ११ वाजता परत येतांना एका पबसमोरून आमची गाडी जात असतांना पबमधून एक मुलगा नशेत धावत आला आणि रस्ता ओलांडतांना अकस्मात् आमच्या गाडीवर आपटून खाली पडला. त्याचे डोके गाडीच्या पुढच्या काचेवर इतक्या जोरात आपटले की, तो बेशुद्ध पडला. सिद्धार्थने आधी त्याला तपासले. मग पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला दूरभाष केला. त्यांनी लगेच त्याला रुग्णालयात भरती केले. आमच्या गाडीच्या मागून येणार्या गाडीतल्या एका माणसाने पोलिसांना यात आमची काही चूक नसल्याचे सांगितले. पोलिसांच्या परिस्थिती लक्षात आली; पण अपघातामुळे आम्हाला फारच धक्का बसला होता. ‘तो मुलगा लवकर बरा होऊन आपल्या घरी जावा’, यासाठी आम्ही प्रार्थना केली. गाडीवर आपटलेला मुलगा दुसर्या दिवशी त्याच्या घरी गेला.
१० आ २. कोथिंबिरीची वडी आणि चिमणी यांच्या संदर्भातील अनुभूती
१० आ २ अ. कार्यक्रमाला जातांना ठेवलेल्या कोथिंबिरीच्या वड्या चिमण्यांनी खाल्ल्याने आणि दिवंगत पतींना वड्या आवडत असल्याने त्यांनीच आशीर्वाद देऊन रक्षण केल्याचे जाणवणे : कार्यक्रमाला जातांना मी कोथिंबिरीच्या वड्या आणि रव्याच्या गोड वड्या करून नेल्या होत्या. कोथिंबिरीच्या तिखट वड्यांमागेही एक कहाणी आहे. मार्च १९७९ मध्ये माझ्या यजमानांना कोथिंबिरीच्या वड्या खाण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्यांनी मला त्या करायला सांगितल्या; पण तेव्हा उन्हाळ्यामुळे चांगली कोथिंबीर मिळत नव्हती. त्यामुळे करायच्या राहिल्या होत्या. थोड्याच दिवसांत त्यांचे निधन झाल्यामुळे त्यानंतर २४ वर्षांत मी कधी कोथिंबिरीच्या वड्या केल्या नव्हत्या. त्या दिवशी वड्या केल्यावर मी प्रथम त्यातील एक वडी आमच्या बागेतील हिरवळीवर ठेवली होती. हा अपघात झाल्यावर मी घरी येऊन पाहिले, तर चिमण्यांनी वडी खाल्ली होती. मी म्हणाले, ‘‘सिद्धार्थ, बाबांनी आशीर्वाद देऊन आपल्याला भयंकर अपघातातून वाचवले.’’
१० आ २ आ. अपघातांचे संकट चिमणीने अंगावर घेतल्याचे जाणवणे : नाटक बघायला आमच्या समवेत जे ओळखीचे कुटुंब आले होते, त्यांच्या घराच्या खिडकीवर एक चिमणी उडतांना आपटली आणि मरून पडली. त्यांनी मग ती त्यांच्या घराच्या मागे खड्डा खणून पुरली. माझ्या मनात ‘कोथिंबीर वडी आणि चिमणी मरून पडणे, अपघातांच्या संकटातून सिद्धार्थ वाचणे या सर्व गोष्टींचा काही संबंध असेल का ?’, असे आले. त्या वेळी सिद्धार्थचे मित्र आणि लंडन येथील सनातनचे साधक डॉ. मिलिंद खरे यांच्या सासूबाई सौ. मंजिरी ओक लंडनमध्येच होत्या. त्यांना मी या प्रसंगाविषयी सांगितल्यावर त्या लगेच म्हणाल्या, ‘‘त्यांच्यावरचे (सिद्धार्थवरचे) संकट त्या चिमणीने आपल्या अंगावर घेतले.’’
१० आ ३. दुसर्या दिवशी गाडी रस्त्यावरून घसरून परत अपघात होणे : दुसर्या दिवशी अपघातग्रस्त गाडीची पुढची काच फुटली असल्याने दुपारी १ वाजता सिद्धार्थ दुसर्या गाडीने रुग्णालयातून येत होता. थोडा पाऊस पडत होता. अकस्मात् रस्त्यावर त्याची गाडी घसरली. गाडी प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे गेली. मग गोल फिरून मागून येणार्या गाड्यांसमोर उलट दिशेने थांबली. तेव्हा त्याच्या मागून येणारी एक गाडी थांबली. त्यातून एक गोरा माणूस उतरून म्हणाला, ‘‘तुमची गाडी घसरली; पण त्यात तुमचा काहीच दोष नाही. मी सुमारे १० मिनिटे तुमच्या गाडीच्या मागून येत आहे. पोलीस केस झाली, तर हे माझे ‘कार्ड’ ठेवा. आवश्यकता असल्यास मी तुमच्या बाजूने साक्ष देण्यास येईन.’’ त्यात कुणी घायाळ झाले नव्हते. त्यामुळे तसा काही प्रसंग आला नाही; पण ती गाडी मात्र पूर्णपणे कामातून गेली. अशा प्रकारे १४ घंट्यांत दोन गाड्यांना सिद्धार्थची काही चूक नसतांना मोठे अपघात झाले; पण तो त्यातून आश्चर्यकारकरित्या वाचला. त्याच्यावर कुठेही ओरखडा उमटला नाही कि त्याला मुका मारही लागला नाही.
१० आ ४. परात्पर गुरु डॉक्टरांनी तुमच्या साधनेमुळे मुलगा अपघातातून वाचल्याचे सांगणे : परात्पर गुरुदेवांनी आरंभीपासून मला आमची कुलदेवता ‘अंबेजोगाईची योगेश्वरीदेवी’ हिचा जप ६ माळा आणि वर्ष १९९५ च्या जीवघेण्या मलेरियाच्या दुखण्यातून उठल्यावर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ हा जप ६ माळा करायला सांगितला होता. तो जप मी शक्यतो करत असे; पण कधी कधी तो अल्प व्हायचा. वर्ष २००३ मध्ये मी लंडनला गेले, तेव्हा ६ मास माझा नामजप नियमितपणे होत होता. हे दोन अपघात झाल्यावर मी लंडनहून गोव्याला परात्पर गुरुदेवांना भ्रमणभाष केला आणि सर्व प्रसंग सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमच्या साधनेने त्याला वाचवले.’’ त्यांच्या तोंडातून अमृतवाणी ऐकून मला पुष्कळ आनंद झाला; कारण नुकतेच मी सिद्धार्थला म्हणाले होते की, ‘या वेळी माझी साधना चांगली होत आहे, याचे मला समाधान वाटत आहे.’
११. कौटुंबिक आनंद अनुभवतांना परमेश्वराच्या कृपेची जाणीव असलेल्या श्रीमती अनुपमा देशमुख !
माझा मुलगा आणि मुलगी दोघेही अत्यंत गुणी अन् हुशार आहेत. ते दोघेही आपापल्या संसारात सुखी आहेत. परमेश्वराने ही मुले देऊन मला दुःखाची जाणीव भासू दिली नाही. वर्ष १९९७ पासून मी प्रतिवर्षी लंडन येथील माझ्या मुलाकडे जाते. माझी मुलगी अनेक वर्षे ‘सौदी अरेबियन एअरलाइन्स’मध्ये काम करत होती. माझी मुलगी, जावई आणि २ नातूही अधून-मधून माझ्या घरी येत असत. १५ वर्षांपूर्वी माझ्या जावयाचे मुंबईहून पुण्याला स्थलांतर झाल्याने आम्ही आता पुणे येथे एका इमारतीत बाजूबाजूच्या सदनिकांमध्ये आनंदाने रहातो.
माझ्या जीवनातील आधीच्या सर्व प्रतिकूल काळात माझे आते-मामे भाऊ असणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाचा मला पुष्कळ लाभ झाला. त्यांनी मला ‘मनाची शक्ती वाढवून कायम आनंदात कसे रहायचे ?’, हे शिकवले.
१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचनांचा दिल्याने जलद आध्यात्मिक उन्नती होणे शक्य असणे
परात्पर गुरु डॉक्टर हे पूर्वी संमोहन उपचारतज्ञ म्हणून रुग्णांवर उपचार करत होते आणि त्याद्वारे रुग्णांना बरे करण्यात त्यांचा हातखंडा होता. लंडनला काही वर्षे राहून त्यांनी कित्येकांवर उपचारही केले; पण पुढे त्यांच्या लक्षात आले की, सर्व प्रकारचे उपचार करूनही रोगी बरे होत नाहीत, म्हणजे यात आणखी कुठला तरी एक घटक आहे आणि तो म्हणजे वाईट शक्ती. त्याला उपाय म्हणजे साधना. त्यांच्या भाग्याने त्यांना गुरु म्हणून प.पू. भक्तराज महाराज आणि इतर काही संत लाभले अन् त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. मग त्यांनी स्वतःला अध्यात्मप्रसारात वाहून घेतले. ‘आज ते जगभर त्याचा प्रसार करून लाखो लोकांना मार्गदर्शन करून आनंदाचा ठेवा प्राप्त करून देत आहेत’, हे सर्वांना माहीत आहेच. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पूर्वी संमोहन उपचारांविषयी माहिती येत असे. त्यातल्या स्वयंसूचनातंत्राने स्वतःला आणि इतरांनाही पुष्कळ लाभ होतो. तेव्हा सेवा, नामजप, उपचार इत्यादी गोष्टींबरोबर स्वयंसूचनांचा अवलंब केला, तर आध्यात्मिक उन्नती लवकर आणि चांगली होते.
शेवटी परात्पर गुरु डॉक्टरांना वंदन करून आणि ‘त्यांच्या कृपेचा अमृताचा वर्षाव असाच आपल्या सर्वांवर सदैव होत राहो’, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी हे मनोगत थांबवते.’
– श्रीमती अनुपमा देशमुख (सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेने आणि कै. राजा नेने यांच्या कन्या), पुणे (१६.१.२०२२)
(समाप्त)
दैवी उपचारपद्धतीतून (‘डिव्हाइन हिलिंग’च्या) दिव्य शक्तीचे चांगले अनुभव येणे
‘मधल्या काळात प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका, ‘लिटल थिएटर’च्या सुधा करमरकरांकडून दैवी उपचारपद्धत (डिव्हाइन हिलिंग) या उपचारपद्धतीविषयी समजले. दादर (मुंबई) येथील शिवाजी मंदिरमध्ये जाऊन मी उपचारपद्धत शिकले आणि त्याचे मला आश्चर्यकारक अनुभव आले. यात आरंभी एक मोठी प्रार्थना म्हणायची असते. एकीकडे ताम्हनात पाणी घेऊन त्याच्या बाजूला खडूने पाच आकडे लिहायचे. (बाजूचे चित्र पहावे.) चित्रात दाखवल्याप्रमाणे एक गोल काढून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने १ ते ५ अंक (पाच आकडे म्हणजे पंचमहाभूते) काढायचे आणि अनामिकेने १-३, ३-५, ५-२, २-४, ४-१ हे आकडे रेषेने जोडायचे. म्हणजे १ चांदणी सिद्ध होते. अशा त्या पाण्यात २७ चांदण्या (२७ चांदण्या म्हणजे २७ नक्षत्रे) काढायच्या. त्यानंतर पंचमहाभूते आणि २७ नक्षत्रे यांची प्रार्थना करायची. नंतर दिव्य शक्तीमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आणि ते पाणी ज्यांच्यासाठी प्रार्थना केली असेल, त्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचे. रुग्णालयात आजारी असलेल्या व्यक्तीसाठीही आपल्या घरून ही प्रार्थना करून हे उपचार करता येतात. ही प्रार्थना आणि ‘रेकी’ यात पुष्कळच साम्य आहे. त्यामुळेही मला पुष्कळ चांगले अनुभव आले आहेत.’ – श्रीमती अनुपमा देशमुख (१६.१.२०२२)
|